पुणे – माजी खासदार संजय काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या समभाग व जप्त असलेल्या मालमत्तेची विक्री करण्याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. समभाग विक्री करण्याची जाहीर सूचना मंगळवारी (दि.25) प्रसिद्ध करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानंतर दि. 2 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान बोलीदारांना व इच्छुक खरेदीदारांना कोर्ट रिसीव्हरच्या प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या समभाग व कागदपत्रांची तपासणी तसेच हिंगणे खुर्द, महर्षीनगर ता. हवेली येथील प्लॉटची तपासणी करुन द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने कोर्ट रिसीव्हर यांना दिले आहेत.
काकडे कन्ट्रक्शन कंपनी प्रा.लि या कंपनीने विस्ट्रा “आयटीसीएल’ कंपनीचे तब्बल 786 कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने काकडे यांच्या कंपनीचे समभाग विक्री करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोर्ट रिसीव्हर यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये समभाग विक्री करण्यासंदर्भात वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. दि. 7 ऑक्टोबर रोजी कोर्ट रिसीव्हर यांनी बंद लिफाफ्यामध्ये इच्छुक बोलीदार व खरेदीदार यांची माहिती जमवून त्याचा अहवाल दि.11 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयात जमा करावा. यापुढील प्रकरणाची सुनावणी दि. 11 ऑक्टोबरला ठेवली आहे.