पिंपरी – कोणतीही प्रक्रिया न करता थेट पवना नदीत दूषित पाणी सोडणाऱ्या चिंचवडेनगर येथील विघ्नहर्ता क्लिअरन्स लॉन्ड्री ऍन्ड ड्रायक्लिनर्स सर्व्हिसे ही लॉन्ड्री पालिकेच्या वतीने सील करण्यात आली असून चालकावर गुन्हाही दाखल केला आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विघ्नहर्ता क्लिअरन्स लॉन्ड्री ऍन्ड ड्रायक्लिनर्स सर्व्हिसेसचे स्वप्निल ससे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदीत केजूबाई बंधारा येथे दि. 16 जुलैला पाण्यावर मोठ्या प्रमाणात पांढरा फेस आला होता. याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची पडताळणी केली. हॉटेल भैरव समोर, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडेनगर स्वप्निल ससे यांच्या मालकीच्या विघ्नहर्ता क्लिअरन्स लॉन्ड्री ऍन्ड ड्रायक्लिनर्स सर्व्हिसेस या आस्थापनेची तपासणी केली. त्यानंतर या लॉन्ड्रीमधून ड्रायक्लिनमधील कपडे धुतलेले दूषित पाणी हे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट नदीत जात असल्याचे निदर्शास आले. त्यानुसार ससे यांना पालिकेने नोटीस बजाविली. त्यानंतर गुन्हाही दाखल केला आहे.
लॉन्ड्रीची जागा पालिकेच्या एका कर्मचाऱ्याची
चिंचवडेनगर येथे ज्या जागेवर विघ्नहर्ता क्लिअरन्स लॉन्ड्री ऍन्ड ड्रायक्लिनर्स सर्व्हिसेस आहे, ती जागा महापालिकेच्या एका मुख्य लिपिकाची आहे. संबंधित लिपिक कर्मचारी महासंघाच्या माजी पदाधिकारी असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे विना परवाना लॉन्ड्री चालविण्यासाठी जागा देणाऱ्या त्या कर्मचाऱ्यावर महापालिका आयुक्त शेखर सिंह काय कारवाई करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
फोटो- चिंचवड नावाने