पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : राज्यभरातून भाविक, वारकरी दाखल
देहूगाव – तीर्थक्षेत्र देहूगाव येथे 372 वा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा आज (बुधवार) होत आहे. स्थानिक प्रशासन, शासकीय यंत्रणांसह स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था भाविकांना सेवा, सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देहूरोड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिंड्यासह भाविकांचे दोन-तीन दिवसांपासून आगमन सुरू आहे. वारकरी-भाविकांनी मोकळ्या मैदानावर अखंड हरिनाम, कीर्तनासाठी मंडप उभारल्या आहेत. इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूंनी शेतात, मैदानात दिंड्यानी मुक्कामासाठी आसरा घेतला आहे. ठिकठिकाणी सुरू असलेले भजन, हरिपाठ, चिपळ्या, टाळ-मृदंगाच्या गजराने आणि हरिनामाच्या जयघोषाने देहूनगरी भक्तीमय झाली आहे.
वैकुंठस्थान मंदिर, मुख्य मंदिर, गाथा मंदिर आणि देहूच्या सौंदर्यात भर घालणारे प्रवेशद्वारावर 14 टाळकरी कमानीवर आकर्षक रंगीत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुख्य मंदिरात, वैकुंठस्थान मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज ठेवण्यात आले आहे.
आळंदी येथील स्वकाम सेवा संस्था आणि अनिरूद्ध बापू संस्थेचे खासगी सुरक्षारक्षक विविध सेवा पुरविणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष हभप मधुकर मोरे, विश्वस्त हभप संजय मोरे, हभप विशाल मोरे, हभप संतोष मोरे, हभप अजित मोरे, हभप काशीनाथ मोरे, हभप माणिक मोरे यांनी दिली आहे. बीज सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रम यावेळी जाहीर करण्यात आला.
सोहळा नियोजन आढावा बैठक
देहू ग्रामपंचायत कार्यालयात बीज सोहळा नियोजन आढावा बैठकीच्या वेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांना बसण्यासाठी खुर्ची न मिळाल्याने आणि बीज सोहळा वगळता, विकास कामे व गावातील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या कामाच्या चर्चेमुळे काढता पाय घेत बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे संस्थांचे अध्यक्ष-विश्वस्त यांनी सांगितले.
रंगीत विद्युत रोषणाईचे आकर्षक मुख्य प्रवेशद्वार
देहूतील मुख्य प्रवेशद्वारावर गेली 19 वर्षांपासून तेजस वॉटर सप्लायचे मालक गोवर्धन काळोखे यांच्याकडून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.
यंदाच्या विद्युत रोषणाईमध्ये श्री विठ्ठलाची भक्ती करताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतीमा, घोड्यावर स्वार झालेले राजे तसेच राष्ट्रीय ध्वज असलेला तिरंगा अशा विविध चलचित्रांच्या रोषणाईने भाविक, पर्यटक, देहूकरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आकर्षक बनले होते. त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी
होत होती.
बीज सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रम
पहाटे 3 वाजता “श्रीं’च्या मंदीरात काकड आरती, पहाटे 4 वाजता श्री संत तुकाराम शीळा मंदिर, श्री विठ्ठल-रखुमाई, पालखी सोहळ्याचे जनक, तपोनिधी नारायण महाराज समाधीची महापूजा, संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, वंशज, वारकरी यांच्या हस्ते, पहाटे 6 वाजता वैकुंठगमन स्थान (गोपाळपुरा) संत तुकाराम महाराज महापूजा, सकाळी 10.30 वाजता पालखी प्रस्थान मुख्य मंदिरातून वैकुंठगमन स्थान (गोपाळपुरा) संत तुकाराम महाराज मंदिराकडे, सकाळी 10 ते 12 दरम्यान हभप देहूकर महाराज यांचे वैकुंठ गमन सोहळा कीर्तन. दुपारी 12.30 पालखीचे मुख्य मंदीराकडे पुनरागमन होईल.
“एक गाव एक शिवजयंती’
श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मसोहळा दिवसाआड आल्याने शिवजयंती उत्सव समिती आणि देहूकर यांच्या वतीने शक्ती आणि भक्ती दर्शवणारी पाच दिवसीय शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये भगवा ध्वज पूजन, जगद्गुरू चषक निकाली जंगी कुस्त्या, जागतिक महिला दिनानिमित्त “आई’ या विषयावर व्याख्यान, महाआरोग्य शिबिर, भक्ती-शक्ती सन्मान सोहळा असे विविध कार्यक्रम झाले. गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मिरवणूक काढण्यात येणार आहे.
करोनाची दक्षता घ्या – आयुक्त म्हैसेकर
पुणे येथे दुबईला जाऊन आलेल्या दोघे कोरोनाचे रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. त्यांची स्थिती स्थिर असून, एकाला करोनाची लक्षणे दिसून येत आहे. दोघांवर नायडू रुग्णालयात उपचार सुरू आहे. बुधवारी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा होत असल्याने सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, तसेच सर्दी, खोकला, घशामध्ये खवखव होणे आदी लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. नवल किशोर राम यांनी निवेदन पत्राद्वारे केले आहे.