मुंबई – मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केले. ‘मिमी’ चित्रपटात तिने अभिनेत्री क्रिती सेनॉनबरोबर काम केले होते. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक देखील करण्यात आले होते. इतकेच काय तर ‘मिमी’ चित्रपटासाठी सई ताम्हणकरला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा मानाचा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला होता. या चित्रपटाच्या यशानंतर आता सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलीवूड गाजवण्यास सज्ज होणार आहे. नुकतेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती शेअर केली आहे.
सई ताम्हणकरने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे. मात्र ती कोणत्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हे अद्याप सांगितलेले नाही. सईने दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि रितेश सिधवानी (Ritesh Sidhwani) यांच्या पत्राचा खास फोटो शेअर केला आहे. या पत्रात लिहिले आहे की, “प्रिय सई, तुझ्यासोबत पुन्हा काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि तुला ….या सिनेमाचा भाग बनवून घेण्यासाठी खूप उत्सुक आहोत. तुझ्यासोबत हा नवीन प्रवास सुरु होतोय याचा आनंद आहे. आमच्या नव्या टीममध्ये तुझं मनापासून स्वागत… लवकरच एका नव्या आणि हटके प्रवासाला सुरुवात करूयात…”
या पत्रानंतर सई ताम्हणकरआता पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र सई ताम्हणकर फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटसह नेमक्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करणार याबद्दल माहिती समोर आलेली नाही. सध्या एक्सेल एंटरटेनमेंट ‘फुक्रे 3’ आणि ‘डॉन3’ या चित्रपटांसाठी काम करत आहे. त्यामुळे सई यापैकी कोणत्या चित्रपटात दिसणार आहे? याची चाहत्यांना देखील उत्सुकता लागली आहे.