“आज एक स्वप्न पूर्ण झालं”; सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं नवं घर

मुंबई – सई ताम्हणकर मराठी सिनेसृष्टीतील आघाडाची अभिनेत्री मानली जाते. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत देखील तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘मिमी’ या हिंदी चित्रपटासाठी सईला आयफा फिल्मफेअरने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय सई सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेक व्हिडीओ आणि फोटो ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने एक खास व्हिडिओ शेअर करत मुंबईत नवं घर घेतल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
इनस्टाग्रामवर सई ताम्हणकरने नव्या घराबद्दल चाहत्यांना माहिती देत लिहिले की, “माझं अकरावं घर…आज पुन्हा एकदा मनात भीती आणि उत्साह असून नव्या घरात पाऊल ठेवत आहे. खऱ्या अर्थाने आज एक स्वप्न पूर्ण झालं आहे. मुंबईतलं पहिलं घर घेतलं असून आज या घरात गृहप्रवेश करताना एक वेगळाच आनंद आहे. एक मैलाचा दगड गाठला आहे. घरासोबत प्रत्येकाच्या वेगळ्या आठवणी असतात. त्यामुळे प्रत्येकासाठीच घर हे खूप खास असतात.”
नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी जुन्या घराचा निरोप घेताना सई भावूक झाल्याचे देखील पाहायला मिळाले. “या आनंदाक्षणी एक कडू आठवण देखील शेअर करावीशी वाटतेय. माझं जुनं घर, त्याच्या त्या ओळखीच्या झालेल्या भिंती आणि जुन्या घराचा निरोप घेत आहे. एकेकाळी आराम केलेल्या घराचा आज निरोप घेत आहे. या घरातील प्रत्येक खोलीत आठवणी आहेत. कुजबूज, हास्याचे आवाज आणि गोष्टी…”
View this post on Instagram
पुढे तिने लिहिले, “आज एका नवीन अध्यायाला सुरुवात करत आहे. त्यामुळे कृतज्ञतेने भरुन आलंय. या घरातील आठवणी खूप काही शिकवणाऱ्या आहेत. या घराने मला स्वप्न पाहायला शिकवलं. त्यामुळेच आज अतिशय कृतज्ञतेने या घराचा निरोप घेत आहे आणि माझ्या हक्काच्या नव्या घरात पाऊल ठेवत आहे”. या पोस्टनंतर सईवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमृता खानविलकर, क्रांती रेडकर, प्रसाद ओक, आरोह वेलणकर यासारख्या अनेक कलाकरांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.





