शिर्डी, (प्रतिनिधी) : देश-विदेशातील साईभक्तांचा सहभागाने दि. १३ फेब्रुवारी रोजी यंदाचा साई परिक्रमा सोहळा साजरा साजरा होत आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक ग्रीन अॅण्ड क्लीन शिर्डी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
नर्मदा परिक्रमा, ब्रम्हगिरी परिक्रमा आदींच्या धर्तीवर ग्रीन एन क्लीन फाउंडेशन, शिर्डी ग्रामस्थ, शिर्डी नगरपरिषद व सांईभक्तांकडून गेल्या पाच वर्षांपासून या परिक्रमा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. नगरपरिषदेने या मार्गाची डागडुजी, स्वच्छता, लगतच्या वृक्षांची रंगरंगोटी केली आहे. परिक्रमेतून मिळणारी ऊर्जा व अनुभुतीमुळे दिवसेंदिवस परिक्रमेतील भाविकांचा सहभाग वाढत आहे.
दि. १३ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता श्रीखंडोबा मंदिरात महंत रामगिरी महाराज, महंत काशीकानंद महाराज, स्वामी परमानंद महाराज, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार सदाशिव लोखंडे, शालिनीताई विखे पाटील, संस्थानचे सीईओ तुकाराम हुलवळे, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, संदीप मिटके, मुख्याधिकारी सतीश दिघे, नगरपरिषदेचे माजी पदाधिकारी व शिर्डीतील प्रमुख मान्यवरांच्याहस्ते साईप्रतिमेची पूजा करून परिक्रमेची सुरुवात होईल.
यंदा परिक्रमेत अग्रभागी परिक्रमेचे निशाण असेल. याशिवाय रतलाम येथील पुजारी व झाकी, मध्यप्रदेश मधील फिरत्या वाहनांवर प्रात्यक्षिक करणारे पथक, वाराणशी येथील प्रसिद्ध डमरू वस्त्र वाद्य पथक, पुणे, नागपूर व बीड येथील साईरथ व पालखी सहभागी होणार आहेत. शिर्डी परिसरातील सर्व शाळेच्या वतीने श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा व साईंच्या जीवनचरित्रावर चित्ररथ, लेझीम पथक व विद्यार्थ्यांचे पथनाट्य, विविध वाद्ये, टाळमृदंग, भजनी मंडळ सहभागी होणार आहेत. चौदा किमीच्या परिक्रमा मार्गावर स्वच्छता, सडा, रांगोळ्या, स्वागत कमानी उभारण्यात येत आहेत.
परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थ व भाविकांनी चहा, अल्पोपहार, पाण्याची, स्वच्छतागृहे, प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था केली आहे. पोलिसांबरोबरच स्वयंसेवक म्हणून विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी सेवा देणार आहेत. शिडीर्तील अनेक हॉटेल मालकांनी भाविकांनी सवलतीच्या दरात रूम उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मंगळवारी दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत साईमंदिरालगतच्या शताब्दी मंडपात परिक्रमेची सांगता होणार आहे.