पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका

फलटण -कांबळेश्‍वर (ता. फलटण) येथील भिवाई देवीच्या दर्शनासाठी आलेला भक्त पुराच्या पाण्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात वाहून जाऊन एका झाडाला अडकला. झाडावर बसून त्याने ग्रामस्थांकडे मदतीची मागणी केल्यानंतर महाबळेश्‍वरच्या सह्याद्री ट्रेकर्स यांच्या मदतीने त्याला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

गौंडवाडी (ता. सांगोला जि. सोलापूर) येथून बुधवारी दि. 14 रोजी रात्री भिवाई देवीच्या दर्शनासाठी आलेला गोरख नामदेव शेडगे (वय 55) हा भक्त देवीच्या दर्शन झाल्यावर रात्री मंदिरातच झोपला. वीर धरणातून सोडलेल्या पाण्याने नीरा नदीला आलेल्या पुराचे पाणी मंदिरात पोहचले, त्यावेळी मध्यरात्री जाग आल्यानंतर आपण संकटात सापडल्याचे लक्षात येताच उठून उंच भिंतीवर बसून दिवस उजाडण्याची वाट पाहत सकाळपर्यंत भिंतीवर बसून राहिला. दूर अंतरावर ग्रामस्थ दिसताच त्याने वाचविण्याची विनंती केली. ग्रामस्थ त्याला पुरातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असतानाच तो मंदिराच्या मंडपाबाहेर आला.

मात्र, पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि मोठा पूरयाचा अंदाज न आल्याने तो पाण्याबरोबर वाहून गेला. तेथून सुमारे 200- 300 फूटावरील एका बाभळीच्या झाडाला अडकला. पोलीस पाटील महेश भिसे व ग्रामस्थांनी महसूल व पोलीसांशी संपर्क साधला. निवासी नायब तहसीलदार आर. सी. पाटील, प्रभारी पोलीस निरिक्षक नितीन सावंत, मंडलाधिकारी कोंडके, तलाठी धुमाळ व पोलीस कर्मचारी तातडीने भिवाई मंदिरापाशी दाखल झाले. आर. सी. पाटील व नितीन सावंत यांनी सह्याद्री ट्रेकर्सशी संपर्क साधला.

सह्याद्री ट्रेकर्सचे जवान मोटरबोट व अन्य साहित्यासह कांबळेश्‍वर येथे दुपारी साडेबारा वाजता दाखल झाले. बोटीने झाडापाशी जाऊन त्यांनी अडकलेल्या भक्ताला सुखरुप पाण्याबाहेर काढण्यात यश मिळविले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.