कोयना धरणाचे दरवाजे दीड फूटावर स्थिर

कराड/पाटण -पश्‍चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचा मोठा फटका कराड व पाटण तालुक्‍यांना बसला आहे. मुसळधार पावसाने येथील शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे साडेतीन फूटांनी उघडण्यात आले होते. मात्र, गुरूवारी पावसाचा जोर मंदावल्याने दरवाजे दीड फूटावर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

गुरूवारी पहाटेपर्यंत कोयना धरणात प्रतिसेकंद 33 हजार 92 क्‍यूसेक पाण्याची आवक होत होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणातून बुधवारी सायंकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे 3 फूट 6 इंचाने उघडून धरणातून 33 हजार 921 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गुरूवारी पहाटेपर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. मात्र, गुरूवारी दुपारनंतर
पावसाचा जोर ओसरल्याने धरणाचे दरवाजे सायंकाळी दीड फुटावर स्थिर ठेवण्यात आले.

मुसळधार पावसामुळे ऊस पिकासह काढणीला आलेले भात, हायब्रीड, नाचणी पीक भुईसपाट झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. झाडे उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहे. करोनातून सावरण्याचा प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्याला आसमानी संकटाचा मोठा फटका बसला आहे. यात दोन्ही तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचेनुकसान झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.