मुंबई: मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात करोनाबाधित मातांच्या सुखरुप प्रसूतीने 300चा टप्पा पार केला आहे. नायर रुग्णालयाच्या या कामगिरीने करोना विरोधातील मानवाच्या लढ्यास एका वेगळ्या शुभवर्तमानाची जोड दिली आहे. आज (14 जून) सकाळपर्यंत प्रसूतींची एकूण संख्या 302 झाली आहे.
एप्रिल महिन्यात कोविड रुग्णालय म्हणून घोषित झालेल्या नायर रुग्णालयात 14 एप्रिल 2020 रोजी पहिल्या करोनाबाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती. त्यानंतर गेल्या 2 महिन्याच्या कालावधीत नायर रुग्णालयात 302 कोरोनाबाधीत मातांची सुखरुप प्रसूती झाली आहे. यामध्ये एका तिळ्यांसह जुळ्या बाळांचाही समावेश आहे.
बाळांची संख्या आज सकाळ पर्यंत 306 झाली आहे, अशी माहिती नवजात शिशू आणि बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉक्टर सुषमा मलिक, प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नीरज महाजन आणि भूलशास्त्र विभागाच्या डॉक्टर चारुलता देशपांडे यांनी दिली आहे.