उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव येथे सशस्त्र दरोडेखोरानी धुमाकूळ घातला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना रविवारी पहाटे घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरोडेखोरांनी गावातील वेगवेगळ्या चार घरांना लक्ष्य बनविले. यात अण्णा डोके, भुसार मालाचे व्यापारी अरुण मोटे व त्यांच्या पत्नी कालिंदा मोटे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. अण्णा डोके यांच्यावर बीड येथील ग्रामीण रुग्णालयात तर अरुण मोटे व त्यांची पत्नी यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
याचवेळी पारगावचे माजी सरपंच महादेव आखाडे यांच्याही घरांवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, येथील कुटुंब जागे असल्याने चोरटे पळून गेले. दरम्यान, मेहबूब पठाण यांच्या घरात जाऊन दरोडेखोरांनी गल्ला तोडण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, शेजारच्या काही लोकांच्या घराच्या कड्या लावून हा मारहाणीचा प्रकार घडल्याने गावातील नागरीक भयभीत झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ व्यवसायिकांनी गाव बंद केले आहे.