भोपाळ मधून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भोपाळ – भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी आज आपला अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर या सातत्याने त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या बऱ्याच चर्चेत आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

साध्वी प्रज्ञा सिंग यांनी परवा मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये वीर मरण प्राप्त झालेल्या हेमंत करकरे यांच्याबाबत अशोभनीय वक्तव्य केलं होतं. यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा एका दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. हे प्रकरण ताजे असतानाच साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना त्यांच्या आणखीन एका वक्तव्यासाठी भोपाळच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी “मी आयोध्येतील ती इमारत पाडण्यात सहभागी होते आणि तेथे राम मंदिर उभारण्यासाठी देखील उपस्थित राहीले ” असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपला अर्ज आज दाखल केला आहे.

दरम्यान, धक्कादायक वक्तव्यामुळे वादात अडकलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची भाजपकडून पाठराखण करण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हंटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.