सुजय विखेंच्या प्रतिष्ठेची तर संग्राम जगतापांच्या अस्तित्वाची लढत

 एकतर्फी वाटणारी निवडणूक अखेरच्या टप्प्यात चुरशीची

नगर: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची 2019 ची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून हा मतदारसंघ राज्यात नाही तर देशापातळीवर गाजला. 1991 च्या लोकसभेची पूर्नरावृत्ती तर 1999 ची पुर्नरावृृत्ती होणार अशा प्रकारे आव्हान प्रतिआव्हान सुरुवातीपासून देण्यात आल्याने ही निवडणूक कोणत्या थराला जाणार हे कळत नव्हते. राष्ट्रवादीने उमेदवार नसतांनाही त्यांनी जागा न सोडण्याच्या भूमिकेमुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे सुपूत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळाली. राष्ट्रवादीने देखील भाजप नेत्यांची कोंडी करीत नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली. सुरुवातील डॉ. विखे यांच्यासाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक अखेरच्या टप्प्यात मात्र चुरशी झाली आहे.उत्तरेतून येवून दक्षिणेत उमेदवारी मिळवून आता विजय मिळण्यासाठी डॉ.विखेंची प्रतिष्ठापणा लागली आहेत. तर दक्षिणेतील उमेदवारी म्हणून आ. जगताप यांच्या अस्तित्वाची लढत झाली आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक गेल्या चार ते पाच महिन्यांपासून चर्चेत राहिली आहे. त्यामुळे शेजारच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पूर्णपणे झाकोळली गेली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा मतदारसंघ पहिल्यापासून प्रतिष्ठेचा केला होता. ही जागा कॉंग्रेसला म्हणजे विखेंना न सोडण्याची भूमिका खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच घेतली होती. त्यामुळे विखेंना भाजपच्या उमेदवारीशिवाय पर्याय राहिला नाही. अर्थात डॉ. विखे यांचा भाजप प्रवेशाचा विषय हा प्रवेश होण्याच्या चार महिने पूर्वीपासून चालू होता. विखेंनी प्रवेश केल्यानंतरही राष्ट्रवादीत उमेदवार निश्‍चितीचा घोळ मिटला नव्हता. अखेर आ. जगताप यांना उमेदवारी निश्‍चित करण्यात आली. डॉ. विखे यांनी गेली तीन वर्षांपासून लोकसभेची तयारी सुरू केली.

जनसेवा फांउडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे घेवून त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला होता. कार्यकर्त्यांसह विखे यंत्रणा थेट गावपातळीपर्यंत पोहोचली होती.त्यात भाजपची उमेदवारी मिळाल्याने डॉ. विखेंची ताकद वाढली. युतीमुळे शिवसेना, भाजप व कॉंग्रेस विखे गट अशी तिहेरी ताकद डॉ.विखेंना मिळाली. त्यात भाजपचे बूथपातळीवर झालेले काम डॉ. विखेंच्या चांगलेच पथ्यावर पडणार आहे. भाजपचे तीन व शिवसेनेचा एक आमदार असे चार विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्‍क्‍याची खात्री. यामुळे डॉ. विखेंसाठी ही निवडणूक एकतर्फीच वाटत होती. अर्थात जिल्ह्याभरात देखील ती चर्चा रंगत होती.

राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर मागचा पुढचा विचार न करता आ. जगताप यांनी लगेचच प्रचाराचे नियोजन करून कार्यकर्त्यांची फौज तयार केली व लगेच गावन्‌ गाव पिंजून काढण्यास सुरवात केली. अर्थात आ. जगताप यांच्या पुढे अनेक प्रश्‍न होते. पण त्या प्रश्‍नांकडे त्यांनी लक्ष न देता केवळ लोकांमध्ये जाण्याची भूमिका घेतली. राष्ट्रवादीत अनेकांची दुखणी होती. परंतू ती दुखणी शरद पवार यांनी दुरुस्त केली. आ.जगताप यांच्याकडे जुळवाजुळवीची कला असल्याने त्यांनी एक – एक विधानसभा मतदारासंघात जावून प्रचाराबरोबरच नेते व कार्यकर्त्यांचे पाठबळ वाढविण्याचा धडाका लावला.

दक्षिणेत कॉंग्रेसची ताकद अतिशय कमी असल्याने संपूर्ण भिस्त तशी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर होती. शरद पवारांनी बऱ्यापैकी सर्वच तालुक्‍यात दुरुस्ती केल्याने राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते आ. जगताप यांच्यासाठी दिवसरात्र एक करू लागले. त्यात कॉंग्रेसचे माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील आ. जगताप यांच्यासाठी मोठी ताकद उभी केली. अर्थात विखेंच्या पराभवासाठी आ. थोरात यांनी ही यंत्रणा उभी केली. त्यामुळे एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात चुरशीची झाली आहे.

या पंधरा दिवसात विखेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह मुख्यमंत्र्यांच्या तीन सभा झाल्या. पंकजा मुंडे यांच्या दोन तर महादेव जानकर, प्रा. राम शिंदे यांच्यासह अनेकांच्या सभा झाल्या. विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पुत्रप्रेमासाठी थेट डॉ. विखेंच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी आपली ताकद देखील पणाला लावली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे, डॉ. विखेंच्या पत्नी धनश्री या देखील तालुकानिहाय प्रचारात सक्रिय झाल्या होत्या. शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील यात अंग झोकून काम केले. तसेच आ. जगताप यांच्यासाठी शरद पवार हे मोठे शस्त्र जिल्ह्यात ठाण मांडू होते.

पवारांनी दोन जाहीर सभा घेवून सातत्याने जिल्ह्यातील नेत्यांची संपर्क ठेवून आवश्‍यक तेथे दुरुस्ती देखील केली. धनजंय मुंडे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ यांच्यासह आदी नेत्यांच्या सभा झाल्या. गेली पंधरा दिवस सभा, बैठकांनी जिल्ह्यातील वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. आघाडी व युतीच्या नेते व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. यंदा उन्हाचा तडाखा चांगला असल्याने प्रचारात अडचणी निर्माण झाल्या. पण कार्यकर्त्यांनी सकाळी व सायंकाळी प्रचारावर भर दिला.

युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष फिरकले नाही

युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे या मतदारसंघात प्रचारासाठी फिरकले नाही. 2014 निवडणूक आ. जगताप यांच्या विरोधात तांबे लढले होते. त्यात त्याचा पराभव झाला होता. पुण्याच्या मेळाव्यात तांबे यांनी ज्याच्या विरोधात लढलो आज त्यांचा प्रचार करण्याची वेळ आली आहे. हे फार जीवावर आले आहे. पण आघाडीचा धर्म पाळावा लागणार आहे. असे म्हणून त्यांनी प्रचार करणार असे स्पष्ट केले होते. परंतू या पंधरा दिवसात ते या मतदारसंघात प्रचारासाठी आले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.