Sadashiv Amrapurkar : हिंदी तसंच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी छाप पाडणारे दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर (Sadashiv Amrapurkar) यांच्या घराला आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. काल (दि.13) बुधवारी हा प्रकार घडला आहे. अहमदनगरच्या सुमन अपार्टमेंटमध्ये असलेल्या त्यांच्या घराला ही आग लागली होती. आगीत त्यांच्या घरातील सर्व सामान जळून खाक झालं आहे.
दुपारी दोन वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. आग लागली तेव्हा घरात अनेक लोक उपस्थित होते. सुदैवाने अग्निशमन दलाचे जवान वेळीच घटनास्थळी दाखल झाले आणि लोकांना सुरक्षित बाहेर काढलं.
सदाशिव अमरापूरकर यांच्या कुटुंबाचे सुमन अपार्टमेंटमध्ये 4 फ्लॅट आहेत. हे घर त्यांची पत्नी सुनंदा सदाशिव यांच्या नावे आहेत. पत्नीने सर्व घरं भाड्याने दिली आहेत. तसंच सर्व कुटुंब मुंबई आणि पुण्यात राहतं. दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर हे मूळचे अहमदनगरचे होते. त्यांना अभिनयाची आवड होती.
थिएटर केल्यानंतर त्यांनी गोविंद निहलानी यांच्या ‘अर्ध सत्य’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी जवळपास 60 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांनी हिंदीत ‘मोहरा’, ‘अर्धसत्य’, ‘हम है कमाल’ आणि ‘सडक’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सडक चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली.
सदाशिव अमरापूरकर यांना फुफ्फुसासंबंधित आजारामुळे 2014 साली कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि 3 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले.