Actress Laila Khan Murder Case – अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच परवेज ताक याला दोषी ठरविण्यात आले. हा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. साल 2011 मध्ये लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच सदस्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
घटनेच्या 14 वर्षांनंतर परवेजला दोषी ठरविण्यात आले आहे. परवेज याला न्यायालयाने खुनाचा कट रचणे, खून करणे आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले. परवेज हा लैला हिच्या आईचा तिसरा पती होता. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी परवेज याला अटक केल्यावर काही महिन्यांनंतर लैला आणि तिच्या कुटुंबीयांचे हत्याकांड उघडकीस आले होते.
या खटल्यात 40 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हत्या करुन मृतदेह इगतपुरीच्या एका फार्म हाऊसमध्ये पुरल्याचे उघड झाले आहे. या घटनेच्या एक वर्षानंतर सर्व मृतदेह सापडले. परवेज ताक हा लैला खान आणि कुटुंबियांसोबत असायचा.
दरम्यान, महिन्याच्या सुरुवातीला दोषी ठरवल्यानंतर परवेज ताक याला आता फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेल्या आठवड्यात सरकारी वकील पंकज चव्हाण यांनी या प्रकरणाचे दुर्मिळातील दुर्मिळ असे वर्णन केले होते आणि दोषी परवेजला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.