नगर -गेल्या आठ दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. म्हणून नगरसेवक गणेश भोसले व नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी आज थेट वसंत टेकडी वरील महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पालाच भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये रिकामी गोणी अडकून बसल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, दोन दिवसांत नगर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनातच ठिय्या आंदोलन करणार असल्याचे नगरसेवक भोसले व भागानगरे यांनी महापालिका प्रशासनाला इशारा दिला आहे.
शहरातील सारसनगर, भोसले आखाडा, स्टेशन परिसरात गेली आठ दिवसांपासून पुरेसा व वेळेत पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांनी नगरसेवकांशी संपर्क केला. नगरसेवक भोसले व भागानगरे यांनी ही बाब महापालिका अधिकाऱ्यांना सांगितली. तरीही पाणी पुरवठा सुरळीत होत नव्हता. म्हणून आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास भोसले व भागानगरे यांनी वसंत टेकडी येथील महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाला भेट दिली.
व वसंत टेकडी येथील उपाय योजना व यंत्र सामुग्रीची पाहणी केली.
यावेळी महापालिकेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख महादेव काकडे उपस्थित होते. त्यावेळी भोसले व भागानगरे यांना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये चक्क रिकामी गोण्या अडकून बसल्याचे आढळून आले. या गोणीमुळे पाणी पुरवठा विस्कळीत होत होता असे काकडे यांनी सांगितले.
यावेळी भोसले व भागानगरे यांनी शहराचा पाणी पुरवठा दोन दिवसांत सुरळीत न झाल्यास आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिका आयुक्तांच्या दाखनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
“त्या’ महापालिका कर्मचाऱ्यांवर झाली पुष्पवृष्टी
पाईपलाईन रस्त्यावरील पद्मानगरमध्ये गेली आठ दिवसांपासून पाणी पुरवठा होत नव्हता. त्यामुळे नागरिक त्रस्त होते. महापालिका कर्मचाऱ्यांनी या बाबत आज शोध घेतला असता पाण्याच्या पाईपलाईनमधील व्हॉल्व्हमध्येही सिमेंटची गोणी अडकल्याचे आढळून आले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही गोणी काढून टाकल्याने परिसरातील नागरिकांनी जल्लोष केला. वैष्णवमाता विकास प्रतिष्ठानतर्फे महापालिकेचे व्हॉल्व्हमन विष्णू येमूल, कर्मचारी कैलास महामुनी, बाबासाहेब मोरे, एकनाथ पाचारणे यांच्यावर पुष्पवृष्टी केली. यावेळी प्रतिष्ठानचे अंकुश चत्तर, प्रशांत पाटील, श्याम औटी, संजय शहाणे, रवींद्र चोथे, प्रवीण भागवत आदी उपस्थित होते.