भोर -पत्नीचे गावातील एका तरुणाबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पतीने पत्नीच्या प्रियकराचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना भुतोंडो (ता.भोर) येथे रविवारी (दि. 10) रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी भोर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
मनोज तुकाराम कदम (वय 30 रा.भुतोंडे, ता. भोर) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर संदीप नारायण कंक (वय 35, रा. भुतोंडे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर विकास सोमाजी कदम यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, भुतोंडे गावातील संदीप कंक यांच्या पत्नीचे गावातील मनोज कदम याच्याशी गेले तीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते.
याची माहिती कंक यांना मिळाल्याने त्यांनी रागाच्या भरात भुतोंडे येथील गाड्या उंबराजवळील भैरवनाथ मंदिरासमोर रविवारी रात्री दहाच्या सुमारास पत्नीचा प्रियकर मनोज कदमवर कोयत्याने वार करून त्याला ठार मारले, असे फिर्यादित नमूद केले आहे.
दरम्यान, घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना व उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी भेट देऊन माहिती घेत पोलिसांना सूचना केल्या. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू मोरे करीत आहेत.