मुंबई – खंडणी वसुलीप्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला
13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाझे सध्या मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहे.
गोरेगावमधील एका वसुली प्रकरणात सचिन वाझेला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते. वाझेचा ताबा मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले होते. यावेळी त्याला 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची कोठडी संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याच्या कोठडीत 13 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन ठेवण्यात आले होते. हे वाहन वाझेंनी ठेवल्याचा आरोप आहे. या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांची हत्या झाली होती. या हत्येचा आरोपही वाझेंवर आहे.
त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी एनआयएकडून वाझेचा ताबा मिळवण्यासाठी पोलिसांनी विशेष एनआयए न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर वाझेचा ताबा पोलिसांना देण्यात आला आहे.
दरम्यान, गोरेगावमधील विमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याने सचिन वाझे, परमवीर सिंग, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह आणि रियाज पटेल यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.