मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने विशेष कोर्टाचा आदेश रद्द बातल ठरवून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबर पर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवले आहे. विशेष न्यायालयाने त्यांना ज्युडिशियल कस्टडीत पाठवले होते.
विशेष न्यायालयाच्या आदेशाला ईडीने मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते, त्यावर आज सुटीकालीन न्यायाधीश महादेव जामदार यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यावेळी देशमुखांच्या वकिलांनी ईडीच्या अर्जाला जोरदार विरोध केला. देशमुख स्वत: ईडीला सहकार्य करण्यासाठी पुढे आले असून ईडीमार्फत चौकशी करण्यास त्यांनी स्वत: संमती दिली आहे असेही त्यांच्या वकिलांनी कोर्टात नमूद केले. त्यानंतर कोर्टाने देशमुखांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवले.
देशमुख यांना 12 तासांच्या चौकशीनंतर 2 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. देशमुख यांच्यावर मनिलॉंड्रिग प्रकरणात गुन्हा दाखल असून या प्रकरणात त्यांच्या संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे नावाच्या दोन सहकार्यांनाही अटक केली आहे. संजीव पलांडे हे ऍडिशनल कलेक्टर रॅंकचे अधिकारी असून ते देशमुखांचे प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून काम करीत होते तर कुंदन शिंदे हे देशमुखांचे पर्सनल असिस्टंट म्हणून काम करीत होते.