बालपण म्हटले की, आठवणींचा पूर येत असतो. जीवनामध्ये बालपण हे सर्वाधिक आनंदी मानले जाते. बालगीतांपैकी “लहानपण देगा देवा’ हे गाणे वेळोवेळी गायले जाते. आता “लहानपण देगा देवा’ हे सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदेने चक्क प्रत्यक्षात
अमलातदेखील आणले आहे. नुकतेच “मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’च्या प्रोमोसाठी या दिग्गजांनी शाळेचा गणवेश परिधान करत बालपणीच्या आठवणींना उजळा दिला आहे.
लहाणपण म्हटले की शाळा, खाऊ, मस्ती, धमाल, बडबड गीत, शाळेचा गणवेश असे सर्व काही डोळ्यासमोर येते. “मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’ या नव्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्ध
अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे देखील आता शाळेच्या आठवणींमध्ये हरवले आहेत.
या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. उंच भरारी घ्यायची असेल तर “मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’चा मंच तुम्हाला खुणावतोय, अशी हटके थीम या प्रोमोसाठी वापरण्यात आली आहे. या प्रोमोमध्ये सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदेने शाळेचा गणवेश परिधान केला आहे.