लाहोर – भारताचाच नव्हे तर जागतिक क्रिकेटचा सम्राट सचिन तेंडुलकरला कधीच पर्याय निर्माण होणार नाही. तो एकमेवाद्वितीय आहे, त्याच्यासारखा खेळाडू शतकातून एकदाच जन्माला येतो, अशा शब्दांत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने सचिनचे कौतुक केले आहे.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विचारल्या गेलेल्या प्रश्नावर इंझमामने आपली मते मांडली. त्याने एक व्हिडीओ तयार केला असून त्यात तो सचिनचे गुणगान करताना दिसतो. सचिन क्रिकेट खेळण्यासाठीच जन्माला आला आहे. क्रिकेट आणि सचिन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सचिनला वगळून क्रिकेटचा उल्लेखच करू शकत नाही.
सर्वकालीन सर्वोत्तम सचिनने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि नंतर क्रिकेटवर राज्य केले. सचिनने पहिला आंतरराष्ट्रीय दौरा पाकिस्तानचा केला होता. 16 व्या वर्षी वसिम अक्रम, वकार युनिस आणि इम्रान खान या महान गोलंदाजांचा सामना करतानाच सचिनची महानता समजली होती, असेही इंझमामने सांगितले.