Sachin Pilot : काँग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मंगळवारी टोंक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पायलट हे सध्या टोंक मतदारसंघाचे आमदार आहेत. सचिन पायलट यांनी या शपथपत्रात पत्नी सारा पायलटपासून घटस्फोट घेतल्याचा खुलासा केला आहे. याआधी दोघेही वेगळे राहत असल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र दोघांकडूनही घटस्फोटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. पायलट यांनी दोन्ही मुलांचा नक्कीच उल्लेख केला आहे. तर 2018 च्या निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पत्नी आणि दोन मुलांचा उल्लेख केला होता.
पायलट यांच्या प्रतिज्ञापत्रात खालील गोष्टींचा उल्लेख –
पाच वर्षांत किती संपत्ती वाढली?
2018 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, सचिन पायलट यांच्याकडे 6.43 कोटी रुपयांची संपत्ती होती. जी आता वाढून 7.23 कोटी रुपये झाली आहे. सचिन पायलट यांच्याकडे 2018 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 1.50 कोटी रुपयांची जंगम आणि 2.21 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती. पत्नी सारा पायलट यांच्या नावावर 1.21 कोटी रुपयांची स्थावर आणि 1.33 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता होती. तर एका मुलाच्या नावावर 13,68,000 रुपये आणि दुसऱ्याच्या नावावर 2,59,000 रुपयांची जंगम मालमत्ता होती. अशाप्रकारे सचिन पायलट यांनी एकूण 2,99,75,000 रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली होती. त्याच वेळी, एकूण 3,43,64,000 रुपयांची स्थावर मालमत्ता घोषित करण्यात आली होती.
यावेळी पायलट यांनी 5.7149 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 1.25 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता त्यांच्या नावावर असल्याचे घोषित केले आहे. त्याचवेळी, एका मुलाच्या नावावर 20.18 लाख रुपये आणि दुसऱ्या मुलाच्या नावावर 6.34 लाख रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर करण्यात आली आहे. गतवेळेप्रमाणे यंदाही पुत्रांच्या नावावर स्थावर मालमत्ता नाही. त्याचबरोबर पत्नीबाबत प्रतिज्ञापत्रात कोणताही उल्लेख नाही. अशा प्रकारे, त्यांनी 5.97 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 1.25 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता घोषित केली आहे.
भिवडी घराचा उल्लेख नाही –
पायलट यांनी 2018 च्या प्रतिज्ञापत्रात भिवडीमध्ये घर असल्याचा उल्लेख केला होता. त्या शपथपत्रात पायलट यांनी अरवली विहार, भिवडी येथे घर असल्याचे सांगितले होते. जे त्यांनी 2010 मध्ये 14.72 लाख रुपयांना खरेदी केले होते. त्यावेळी त्याची किंमत 19 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रतिज्ञापत्रात या घराचा उल्लेख नाही. त्याचवेळी, यावेळी प्रतिज्ञापत्रात पायलट यांनी जयपूरमध्ये 435.72 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट असल्याचे म्हटले आहे. जयपूरच्या मानसरोवर परिसरात असलेला हा फ्लॅट 2021 मध्ये 30 लाख रुपयांना खरेदी करण्यात आला होता. सध्या त्याची किंमत 36 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
सारा ही फारुख अब्दुल्ला यांची मुलगी –
सारा पायलट ही जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलगी आहे. सारा यांचा भाऊ ओमर अब्दुल्ला हेही जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री राहिले आहेत. परदेशात शिकत असताना सचिन आणि सारा पायलट जवळ आले. यानंतर दोघांनी जानेवारी 2004 मध्ये लग्न केले. 2018 मध्ये काँग्रेस सरकारच्या शपथविधीवेळी सारा आपल्या दोन मुलांसह आली होती. मात्र आता दोघांचा घटस्फोट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सचीन पायलट यांनी प्रतिज्ञापत्रात सारा यांचा उल्लेख केलेला नाही.