पुणे – स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित दुसऱ्या एस. बालन करंडक अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत किंग्ज स्पोर्ट्स क्लब संघाने सेंच्युरी क्रिकेट क्लब संघाचा सुपर ओव्हरमध्ये रोमहर्षक विजय नोंदविला. किंग्ज स्पोर्ट्स क्लब संघाने स्पर्धेत सलग तीन विजयांची नोंद केली.
मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शेवटच्या षटकापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात किंग्ज स्पोर्ट्स क्लबने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना किंग्ज संघाने 20 षटकात 7 गडी गमावून 155 धावांचे उभे केले. यामध्ये अजित गव्हाणे याने 51 धावांची खेळी केली.
याबरोबरच पवन शहा (20) व मिझान सय्यद (25) धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सेंच्युरी क्रिकेट क्लब सुरेख सुरुवात केली. अनिकेत पोरवाल (87 धावा) याने एक बाजू लावून धरत खेळाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. त्याला यश नहार (23 धावा) व निशांत नगरकर (15) यांनी चांगली साथ दिली.
शेवटच्या षटकामध्ये सेंच्युरी संघासाठी 9 धावा आवश्यक होत्या. किंग्जच्या वैभव गोसावी याने या षटकामध्ये भेदक गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर वैभव याने अनिकेत पोरवालला बाद केले. दुसऱ्या चेंडूवर निशांत नगरकर हा सेंच्युरी संघाचा खेळाडू धावबाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या शुभम हरपाळेने पुढील तीन चेंडूवर 7 धावा चोपून सामन्यामध्ये रंगत आणली. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी दोन धावांची आवश्यकता होती.
वैभव याने अक्षय दरेकर याला चेंडू टाकला व कव्हर्समध्ये फटकावलेल्या चेंडूवर दुसरी धाव घेताना सेंच्युरी संघाचा शुभम हरपाळे धावबाद झाला आणि सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये सेंच्युरी क्रिकेट क्लबला 1 षटकात 10 धावा करता आल्या. किंग्ज स्पोर्ट्स क्लबने 5 चेंडूत 11 धावा करून विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात पवन शहा याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर किंग्ज स्पोर्ट्स क्लब संघाने ईगल्स क्रिकेट क्लबचा 72 धावांनी विजय मिळवला. किंग्ज संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 180 धावा धावफलकावर लावल्या. पवन शहा (35 धावा), पारस रत्नपारेख (नाबाद 41 धावा) व अजित गव्हाणे (नाबाद 55 धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला.
ईगल्स क्रिकेट क्लब संघाने धावांचा पाठलाग करताना ठरावीक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले. संघाचा डाव 18.5 षटकात व 103 धावांवर संपुष्टात आला. किंग्ज संघाच्या पवन शहा (3-31), ऍलन रॉड्रिक्स् (2-8) व आकाश करगवे (2-13) यांनी चमकदार गोलंदाजी करून संघाला सलग तिसरा विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक –
1) किंग्ज स्पोर्ट्स क्लब ः 20 षटकात 7 बाद 155 धावा. (अजित गव्हाणे 51, पवन शहा 20, मिझान सय्यद 25, यश नहार 2-31) सुपर ओव्हरमध्ये वि. वि. सेंच्युरी क्रिकेट क्लब ः 20 षटकात 6 बाद 155 धावा. (अनिकेत पोरवाल 87, यश नहार 23, निशांत नगरकर 15, आकाश करगवे 2-15); सुपर ओव्हर ः सेंच्युरी क्रिकेट क्लब ः 1 षटकात 10 धावा; किंग्ज स्पोर्ट्स क्लब ः 1 षटकात 11 धावा. सामनावीर – अजित गव्हाणे. 2)
किंग्ज स्पोर्टस क्लब ः 20 षटकात 6 बाद 180 धावा. (पवन शहा 35, पारस रत्नपारेख नाबाद 41, अजित गव्हाणे नाबाद 55, रोहित कारंजकर 2-26) वि. वि. ईगल्स् क्रिकेट क्लब ः 18.5 षटकात 10 बाद 103 धावा. (परमजीत कदम 19, अभिजीत जाधव 15, सुमित गंगवानी 13, सिद्धार्थ रोमन 12, पवन शहा 3-31, ऍलन रॉड्रिक्स 2-8, आकाश करगवे 2-13). सामनावीर – पवन शहा.