पुणे – करोनामुळे गेले वर्षभर वाहतूकदारांना मोठा फटका बसत आहे. यातच केंद्र सरकारने वाहन नुतनीकरणासाठीच्या शुल्कात वाढ केली आहे. ती अधिक असल्याने हा निर्णय वाहतूकदारांना न परवडणारा आहे. त्यामुळे वाहतूकदारांकडून याला विरोध करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमध्ये वाहतूक व्यवसायावर अधिक परिणाम झाला. रिक्षा आणि टेम्पोसह अन्य वाहनांबाबत नव्याने कर प्रणाली राबवण्यात येणार आहे.
फिटनेस प्रमाणपत्रासाठी 7 हजार 500 रुपये अधिक भरावे लागणार असल्याने रिक्षा आणि टेम्पोवर उपजिविका असणाऱ्या वाहनचालकांना फटका बसणार असून, या कर प्रणालीतील सुधारणेत बदल करण्याची मागणी पुणे शहर रिक्षा, टेम्पो मेन्स युनियनकडून करण्यात येत आहे.
अन्यथा सत्याग्रह मार्गाने आंदोलन करण्याच्या इशारा वाहतूकदारांनी दिला आहे. याशिवाय, राज्य सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी संघटनेच्या वतीने अध्यक्ष ऍड. एम.व्ही.अकोलकर यांनी केली आहे.
लॉकडाऊन टप्पा संपल्यानंतर नुकतेच वाहनचालक व्यवसायासाठी रस्त्यावर उतरले आहेत. ऐन अडचणीच्या काळात सरकारने कायद्यात दुरुस्ती केली आहे. सध्याही रिक्षा, टेम्पो चालकांना पूर्वीप्रमाणे व्यवसाय मिळत नाहीत. त्यामुळे तळगाळातील कष्टकरी वर्गाचे जगणे मुश्किल होणार असल्याने या सुधारणेला संघटनेने विरोध केला आहे.