शिक्रापूर – युक्रेन व रशिया यांच्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून युद्ध सुरू होते. दरम्यान, शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील दोघे जण सुखरूप घरी परतली असल्याने पालकांसह गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिवरे कुंभार येथील मयूर मांदळे व कोमल अवगुणे हे दोघे विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी युक्रेन देशामध्ये गेलेले होते. तेथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर दोघांनी दि. 26 फेब्रुवारी रोजी परतीचा प्रवास सुरू केला होता.
त्यावेळी त्यांच्यापुढे पुढे सर्व अंधार दिसत होता. खासगी बसने ते रोमानिया देशाच्या सिमेवर आले. तिथे तीन किलोमीटर अलीकडे त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर त्यांनी पायी जात विना अन्न पाण्याचे चालून देशाची सीमा पार करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी खूप गर्दी झालेली असल्याने 15 तासांचा कठोर सामना करावा लागला. दि. 27 फेब्रुवारी रोजी युक्रेन देशाची सीमा पार करत ते रोमानिया देशाची राजधानी बुकारेस्ट येथे पोहोचले.
तिथे उणे दहा डिग्री तापमान होते. तेथील सरकारनेसर्वांची सर्व राहण्याची व खाण्या पिण्याची सोय केली. या ठिकाणी काही मुलांनी तेथील देशामधील सीम कार्ड खरेदी करत शक्य तसे आपल्या पालकांशी संपर्क साधला त्यांनतर वायूदलाच्या विमानाने मुले दिल्ली सदन येथे दाखल झाले. दोन दिवस तेथे मुक्काम करत भारत सरकारकडून सोय होईल त्या पद्धतीने मुलांना इतर ठिकाणच्या विमान तळावर नेण्यात येत होते.
शिक्रवारी (दि. 4) कोमल अवगुणे तर शनिवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास मयूर मांदळे आपल्या घरी सुखरूप आला. दोघांच्या घरी मुले दाखल होताच पालकांना आनंद झाला असून अनेकांना आपल्या पाल्यांना पाहून आनंदाश्रू दाटून आले. दरम्यान, आजही तेथील परिस्थिती डोळ्यासमोर आल्यास अंगावर काटा येत आहे मात्र आमच्या आई वडील व कुटुंबीयांना पाहून सर्व दु:ख विसरून गेलो असल्याचे मयूर व कोमल यांनी सांगितले.
मुले सुखरूप घरी आल्याचे समाधान
युक्रेनमध्ये आमची मुले शिक्षणासाठी गेलेली असताना अचानकपणे तेथे दोन देशांमध्येयुद्ध सुरु झाले. आमच्या मुलांशी आमचा संपर्क होत नसल्याने आम्ही चिंतेत होतो; परंतु आमची मुले सुखरूप घरी परतल्याचे आम्हाला मोठे समाधान मिळाले असल्याचे बाळासाहेब मांदळे व अशोक अवगुणे यांनी सांगितले.