पुणे – महापालिकेची प्रभाग रचनेच्या सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, प्रत्यक्षात प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचनांच्या सुनावणीनंतर त्याचा अहवाल अद्याप पालिकेकडून निवडणूक आयोगास सादर करण्यात आलेला नाही. तर महापालिकेने केलेल्या मागणीनंतर आयोगाकडून पालिकेस 8 मार्च पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा आयोगाकडून त्याची तपासणी करून अंतिम बदल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्यास मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा अथवा एप्रिल उजाडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाल्याने प्रभागाची मोडतोड झाल्याचे आरोप करत काहीनींनी थेट न्यायालयात धाव घेतली होती तर काहीनीं सुनावणी समोरच प्रभाग रचना कशी चुकीची झाली असून त्यात राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन झालेले नसल्याचे सुनावणीत निदर्शनास आणून दिले आहे. परिणामी या सूचनांची दखल घेतली गेल्या प्रभाग रचनेत मोठया प्रमाणात बदल होणार असल्याने प्रभाग रचनेबाबत इच्छुकांची उत्सुकता शिगेला लागली आहे. तर अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर तयारी कामाला लागण्यासाठी अनेकांचे अद्यापही वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.
म्हणून होणार उशीर..!
राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेने 1 फेब्रुवारीला प्रभाग रचना जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, 14 फेब्रुवारीपर्यंत त्यावर सूचना मागविणे, 25 फेब्रुवारीला सुनावणी घेणे तर 2 मार्च रोजी सुनावणीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे आयोगास अहवाल सादर झाल्यानंतर आठ ते दहा दिवसात म्हणजे 9 ते 10 मार्चला प्रभाग रचना जाहीर होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, प्रत्यक्षात 2 मार्च रोजी अहवाल पूर्ण न झाल्याने महापालिकेने त्यासाठी मुदत मागितली होती, ती 5 मार्चपर्यंत वाढवून देण्यात आली. त्यानंतरही पालिकेचा अहवाल तयार नसल्याने तसेच 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असल्याने पालिकेने मुदत वाढवून मागितली होती. त्यानुसार आयोगाने 8 मार्चपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे 8 मार्च रोजी अहवाल सादर झाला तरी अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्यास, निवडणूक आयोगाकडून या अहवालानुसार, बदलांना मान्यता दिली जाईल अथवा त्यातही बदल केले जातील या प्रक्रियेस आणखी दोन आठवड्यांचा कालावधी जाईल. त्यामुळे अंतिम प्रभाग रचना मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.