नवी दिल्ली – रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर जगभरातील विविध क्षेत्रांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांना कोणत्या न कोणत्या कारणामुळे याचा फटका बसत आहे. या सर्वाचे पडसाद क्रीडाविश्वावर उमटत असून बऱ्याच मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून रशियाला “रेड कार्ड’ दाखविण्यात येत आहे. यामध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक, युएफा चॅम्पियन्स लीग, फॉर्म्युला वन शर्यत अशा मोठ्या स्पर्धांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशननेही मंगळवारी रशिया आणि बेलारूशियन बॉक्सिंगपटूंना स्पर्धेतून निलंबीत करण्याचा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अलीकडील शिफारसीमुळे हे पाऊल आवश्यक आहे. याबाबत संचालकांच्या बैठकित निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये रशियावर बंदी
– फुटबॉल विश्वचषक फिफाकडून आगामी विश्वचषकात बंदी
– युरोपियन फुटबॉल असोसिएशनची अर्थात युएफाकडून बंदी
– ज्युदो महासंघातून पुतीन बडतर्फ
– रशियातील स्कीईंग, फॉर्म्युला वन शर्यत रद्द
– चॅम्पियन्स लीग फायनलचे यजमानपद रशियाकडून पॅरिसकडे
रशियावर आंतरराष्ट्रीय आइस स्केटिंग स्पर्धांमध्ये भाग घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. युक्रेनमधील संघर्षामुळे प्रभावित झालेल्यांना आणि युक्रेन नागरिकांना पाठिंबा दर्शविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आयएसयूने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल फेडरेशनने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पुरुषांच्या जागतिक स्पर्धेचे यजमानपद रशियाकडून काढून घेतले आहे.
एफआयव्हीबीने म्हटले की, युक्रेनमधील युद्धामुळे रशियामध्ये जागतिक चॅम्पियनशिपची तयारी करणे आणि त्याचे आयोजन करणे अशक्य आहे. यामुळे दुसरा यजमान देश शोधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तथापि, जलतरण मंडळाने (एफआयएनए) आतापर्यंत रशियनांवर बंदी घालण्याच्या आयओसीच्या शिफारसीकडे दुर्लक्ष करणे पसंत केले आहे. या खेळाच्या प्रशासकीय मंडळाने रशियन आणि बेलारशियन जलतरणपटूंना FIN ध्वजाखाली स्पर्धेमध्ये भाग घेण्यास अनुमती दिली आहे. तसेच रशियाला डिसेंबरमध्ये होणा-या जागतिक शॉर्ट-कोर्स चॅम्पियनशिपचे यजमान म्हणून कायम ठेवले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्की फेडरेशनने देखील रशियन खेळाडूंना स्पर्धा सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, वेगवेगळ्या खेळांमध्ये रशियावर बंदी टाकण्याच्या कारवाईमुळे रशियासमोर आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यापुढे रशियात एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार नाही. तसेच रशियन खेळाडूंना आपल्या राष्ट्रध्वजाखाली खेळता येणार नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमी असलेले पुतीन एकटे पडण्याची शक्यता आहे.
एलिना स्वितोलिनाचा खेळण्यास नकार
युक्रेनची 27 वर्षीय टेनिसपटू एलिना स्वितोलिनाने मॉन्टेरी ओपन टेनिस स्पर्धेत रशियाच्या अनास्तासिया पोटापोवा विरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे. स्विटोलीनाने ट्विटरवर लिहिले की, महिला दौरा, पुरुष दौरा आणि आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ आयओसीच्या शिफारशींचे पालन करून त्या देशांच्या स्पर्धकांना कोणतीही राष्ट्रीय चिन्हे, रंग, ध्वज किंवा राष्ट्रगीत वापरण्यापासून प्रतिबंधित करेपर्यंत ती रशियन किंवा बेलारूशियन टेनिसपटूंविरुद्ध कोणताही सामना खेळायचा नाही.