नागपुर – नागपुर जिल्हा हार्ड कोर्ट टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित व आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000 डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत स्मृती भसीनने मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवत उद्घाटनाचा दिवस गाजवला.
या स्पर्धेतील एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या स्मृती भसीनने आठव्या मानांकित मिहिका यादवचा 6-3, 6-1 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. हुमेरा बहारमूसने क्वालिफायर कशिश भाटियाचे आव्हान 6-3, 6-4 असे संपुष्टात आणले.
चुरशीच्या लढतीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या युब्रानी बॅनर्जीने ईश्वरी माथेरेचा टायब्रेकमध्ये 6-4, 2-6, 6-7(5) असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. आणखी एका अटीतटीच्या लढतीत डेन्मार्कच्या एलेना जमशेदीने भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या सुदिप्ता कुमारचा 6-2, 2-6, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली.
क्वालिफायर प्रत्युशा रचापुडीने अविष्का गुप्ताचे आव्हान 6-2, 5-7, 6-3 अशा फरकाने 2 तास 38 मिनिटात मोडीत काढले. या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी मिळून सर्व्हिस करताना 21 डबल फॉल्ट केले. चौथ्या मानांकित थायलंडच्या पुनीन कोवापिटूटेडने महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तूरेला 7-6(3), 6-1 असे पराभूत केले.
दुहेरीत पहिल्या फेरीत श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्तीने समा सात्विकाच्या साथीत शर्मदा बाळू व श्राव्या शिवानी चिल्कापुडी या चौथ्या मानांकित जोडीचा 7-6(4), 6-2 असा पराभव करून पुढच्या फेरीत आगेकूच केली.