लंडन – युरोपियन कार्टिंग स्पर्धेनंतर ( Karting Championship ) पुरस्कार वितरण समारंभात एका रशियन खेळाडूने फॅसिस्ट पद्धतीने सलाम केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. इटलीचे राष्ट्रगीत वाजवले जात असताना या रशियन खेळाडूने फॅसिस्ट सलाम केला व त्यावर सध्या कडाडून टीका होत आहे. आर्टेम सेवेरिउखिन ( Artem Severiukhin ) हा रशियन कार्टिंग ड्रायव्हर असून सध्या रशियावर आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागावर बंदी घालण्यात आल्याने तो इटलीच्या ध्वजाखाली या स्पर्धेत सहभागी झाला होता.
FIA is launching a investigation into the incident where Russian driver Artem Severiukhin (competing under the Italian flag) showed a nazi salute at the World Karting Championship.
— F2.Addict (@AddictF2) April 11, 2022
रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धामुळे जगभरातून रशियावर निर्बंध लावण्यात आले आहेत. यातच ही घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा रशियाच्या खेळाडूंना अन्य कोणत्याही ध्वजाखाली देखील कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेता येऊ नये अशी नियमावली तयार करावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
पुरस्कार वितरणप्रसंगी आर्टेम रोमन सॅल्युट करताना दिसत असून या पद्धतीने नमस्कार करण्यालाच जगभरात फॅसिस्ट सलाम म्हटले जाते. 20 व्या शतकात हा सलाम फॅसिस्ट गटांसाठी अभिवादन म्हणून वापरला जात असे.
इटलीचे माजी पंतप्रधान बेनिटो मुसोलिनी यांच्या काळात असा सलाम त्यांच्या राजवटीचा एक भाग बनला होता. सेवेरिउखिनला रशियन मोटरस्पोर्ट एसएमपी रेसिंग कंपनीकडून प्रायोजकता मिळते. एफआयएने रशियन आणि बेलारशियन कार्टिंग ड्रायव्हर्सना युक्रेनविरुद्धच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्वत:च्या देशांच्या ध्वजाखाली आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यास मनाई केली असल्यामुळे खेळाडू अन्य राष्ट्रांच्या ध्वजाखाली सहभागी होत आहेत.