पुणे – कोरेगाव पार्कमध्ये एका रशियन दांपत्यास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. हे दांपत्य पुण्यातील एका कंपनीत एक वर्षासाठी कामानिमित्त आले आहे. मध्यरात्री श्वानास घेऊन फिरायला जात असताना ही घटना घडली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दोन दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
शेरगी ऍलेक्झेंडर एशान (वय 33, रा.निझनिया नवगोरोड, रशिया) यांनी तक्रार दाखल केली आहे. या दांपत्याकडे एक वर्षाचे वर्क परमिट आहे. त्यांनी रात्री एका पार्टीमध्ये जेवण केल्यावर श्वानाला घेऊन ते पायी घरी चालले होते. यावेळी दोन दुचाकीवरुन तीन व्यक्ती नॉर्थ मेन रोडवरुन गल्ली क्रमांक तीनमध्ये आल्या. यातील एका दुचाकीस्वाराने श्वानाला बाजूला घ्या, असे म्हणत वाद घातला.
यानंतर त्यांच्यामधील वाद वाढल्यावर शेरगी यांना धक्काबुक्की करुन डोक्यात कठीण वस्तूने वार करण्यात आला. त्यांच्या मागून येणाऱ्या पत्नी दरिया यांनी मदतीसाठी धाव घेतली असता, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर दुचाकीचालकांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस फौजदार वडपेल्ली करत आहे