रशियाकडून करण्यात येत असलेल्या या हल्ल्याला युक्रेनकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दरम्यान युक्रेनच्या सैन्याने दावा केला आहे की, युक्रेनच्या सैन्याने रशियाचे पाच लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर्स पाडले आहेत. युक्रेनच्या सैन्याकडून करण्यात आलेली ही कारवाई पूर्व युक्रेनमध्ये करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.
युक्रेनच्या मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, ब्रोव्हरी आणि कीवमध्ये एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. युक्रेनमध्ये गोळीबार सुरू आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
युक्रेनच्या लष्कराने दावा केला आहे की त्यांनी लुहान्स्क प्रदेशात रशियाची पाच विमाने आणि एक रशियन हेलिकॉप्टर पाडले आहे. तर दुसरीकडे युक्रेनमधील अनेक गावे रशियन सैन्याच्या ताब्यात गेल्याचे सांगण्यात येत आहे. इथे एका पाठोपाठ एक बॉम्बस्फोट होत आहेत. दरम्यान, रशियाने बेलारूस सीमेवरूनही हल्ला केला. रशिया आता युक्रेनवर तीन बाजूंनी हल्ला करत आहे. दुसरीकडे, नाटोही आता रशियाविरुद्ध प्रत्युत्तराच्या लष्करी कारवाईच्या तयारीत आहे.