Russia-Ukraine War। हेल्परचे काम करण्यासाठी म्हणजे रोजगारासाठी भारतातील काही जण रशियात गेले होते. मात्र त्यांना तेथे युक्रेनविरूध्दच्या युध्दात जुंपण्यात आले असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही याची कबुली दिली असून आम्ही रशियाच्या दुतावासाच्या नियमित संपर्कात असल्याचे त्यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तेथे गेलेल्या भारतीय कामगारांनी हेल्परचे काम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट केले असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या मजुरांना ज्या कामासाठी तेथे घेण्यात आले होते ते बाजूला पडून आता युक्रेन विरूध्दच्या युध्दात त्यांना सहभागी होण्यावाचून पर्याय राहीलेला नाही.
रशियात अडकलेले हे बहुतांश मजुर उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात आणि जम्मू काश्मीर या राज्यांतील आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत असून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही या कामगारांना भारतात परत आणण्यासाठी पाउले उचलली जावीत अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे.
या कामगारांना नोकरीची हमी देत रशियाला नेण्यात आले आणि त्यानंतर त्यांना तेथे युक्रेनच्या विरोधात लढण्यासाठी बळजबरी केली गेल्याचेही ओवेसी यांनी सांगितले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की काही भारतीय नागरिकांनी रशियाच्या लष्करासोबत हेल्परच्या कामाचा करार केला होता.
भारतीय दुतावासाने नियमितपणे त्यांना भारतात परत पाठवले जाण्याच्या संदर्भात रशियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. भारतीय नागरिकांनी योग्य ती सावधगिरी बाळगावी आणि युध्दापासून दूर राहावे असे आमचे आवाहन आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युध्दाला आता जवळपास दोन वर्ष पूर्ण होत आली आहेत.
युध्दात रशियाचे पारडे जड असून युक्रेनची बऱ्यापैकी पिछेहाट झाली आहे. युक्रेनकडे आता पुरेसा दारूगोळा शिल्लक राहीला नसल्याने त्यांची पिछेहाट होते आहे. भारताने अधिकृतपणे हे युध्द थांबवावे अशीच भूमिका आजवर घेतली आहे. मात्र भारतीय कामगारांचे रशियात जाणे आणि अशा प्रकारे त्यांना युध्दाच्या तोंडी दिले जाणे ही बाब अचानक समोर आल्यामुळे ती अत्यंत धक्कादायक ठरली आहे. । Russia-Ukraine War