मॉस्को – करोना लसीच्या स्पर्धेत जगात सध्या रशिया सगळ्यांत पुढे आहे. सामान्य नागरिकांना स्फुटनिक 5 ही लस उपलब्ध करून दिल्यानंतर त्या देशातील अन्य एका लसीच्याही सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून येत्या 15 तारखेला ती लॉंच केली जाणार आहे.
एपिव्हॅककरोना असे या दुसऱ्या लसीचे नाव असून तिच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सायबेरियातील व्हेक्टर स्टेट व्हायरॉलॉजी संशोधन केंद्राने ही लस तयार केली आहे. क्लिनिकल चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यांत आमची लस सुरक्षित असल्याचे आढळून आले असल्याचे व्हेक्टरच्या जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून या नव्या लसीला तीन आठवड्यांत परवानगी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लसीच्या निर्मितीचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू केले जाणार असून सुरूवातीला दहा हजार डोस तयार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.