पाटणा – हाथरस येथील दलित मुलीवर सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभर उमटलेले असतानाच बिहारमध्ये गया जिल्ह्यात एका अल्पवयीन दलित मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीला आले आहे. या पीडित मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याचाही प्रकार घडल्याने त्या प्रकरणाचेही तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या मातापित्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून घेतला आहे. त्यांनी चार आरोपींपैकी तिघांची नावे पोलिसांना कळवली आहेत. चौथा आरोपी मात्र अज्ञात आहे. बिहारमध्ये सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
त्यामुळे विरोधकांकडून या घटनेचे भांडवल करीत नितीशकुमार सरकारला लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. नितीशकुमार यांच्या राज्यात दलितच नव्हे तर कोणीच सुरक्षित राहिलेले नाही, अशी टीका राजद पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.