सातारा – शारदीय नवरात्र उत्सव तब्बल दोन वर्षांनी निर्बंध मुक्त साजरा केला जात असल्यामुळे साताऱ्याच्या बाजारपेठेत मोठा उत्साह असून सातारकरांनी मुक्तपणे खरेदीला गर्दी केली आहे. विजयादशमीच्या मुहूर्ताला इन कॅश करण्यासाठी सराफ बाजारात मोठी गर्दी झाली आहे.
सराफ व्यावसायिकांनी वेगवेगळ्या आकर्षक योजना ऑफर केल्याने सराफ दुकानांतून ग्राहकांची गर्दी बाजारपेठेत झाली होती. दोन वर्ष मंदीचा सामना करणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्रालाही यंदाचा दसरा शुभ संकेत घेऊन आला असून मोठे मोठे गृहप्रकल्प लॉन्च होण्याच्या तयारीत आहेत. गृह कर्जाचा व्याजदर वाढूनही सातारकरांनी कॉम्पॅक्ट होम पेक्षा टू बीएचकेला पसंती दिल्याचे दिसून आले.
भाविकांच्या आणि विशेषता खरेदीदारांच्या उत्साहाला उधाण आल्याचे बाजारपेठेतील वातावरणावरून साताऱ्यात दिसत आहे. सर्वच क्षेत्रात मोठी उलाढाल दिसून येत आहे. त्यात दसऱ्याच्या खरेदीची भर पडल्याने व्यापारी वर्गही सुखावला आहे. बुधवारी दि. 5 रोजी दसरा असून साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे दसरा खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. वाहन, सराफ, इलेक्ट्रॉनिक्स रिअल इस्टेट, रेडिमेड गारमेंट यांसह किराणा खरेदीसाठी सातारकर बाजारपेठेत गर्दी करत आहेत. सराफ बाजाराने विशेष सवलत योजना जाहीर केल्या आहेत. महामार्गालगतच्या ब्रॅंडेड कंपन्यांच्या वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी आहे.
मारुती सुझुकी व होंडा गाड्यांच्या शोरूममध्ये आकर्षक ऑफर योजना यापूर्वीच जाहीर झाल्या असून साधारण यंदा बुकिंगचा उच्चांक गाठला जाईल असा अंदाज आहे. रिअल इस्टेटमध्येही बुकिंगला प्राधान्य दिले जात आहे. दसऱ्याच्या दिवशी साताऱ्यामध्ये एकाच वेळी सहा गृहप्रकल्प लॉन्च होतील, असे सांगण्यात आले. देवर्षी प्रॉपर्टीचे संचालक योगेश देवर्षी म्हणाले, “यंदाच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर रिअल इस्टेटला चांगले दिवस आले आहेत. गृह कर्जावरील व्याजदर वाढले तरी सातारकरांनी महागाई असूनही टू बीएचके ना जादा पसंती दिली आहे. या मोठ्या घरांच्या मागण्यांमध्ये 20 टक्के वाढ झाली आहे.’
उपनगरांमध्ये विशेषतः करंजे ग्रामीण, दौलतनगर, सदरबाजार, शाहूपुरी, शाहूनगर यासारख्या नव्या विस्तारित क्षेत्रांना नागरिकांनी पसंती दिली आहे. कपडे बाजारातही मोठी उलाढाल दिसून येत आहे. पूजेचे साहित्य खरेदी करण्यात येत आहे. पावसाने पूर्णतः उघडीप दिल्याने दिवसभर खण आळीमध्ये गर्दी दिसत होती.