वाल्हे – साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा दसरा आणि झेंडूची फुले यांचे नाते पूर्वापार चालत आलेले आहे. खंडेनवमी आणि दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर वाल्हे, दौंडज परिसरामध्ये झेंडूच्या फुलांना सोमवारी (दि. 3) मोठी मागणी होती. प्रति किलोला 80 ते 100 रुपये असा दर मिळत होता. दरम्यान, बुधवारी (दि. 5) दसरा असल्याने मंगळवारी (दि. 4) आणखी दर वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर दौंडज खिंड ते वाल्हे या ठिकाणी अनेक शेतकरी आपल्या शेतामधील झेंडू विकण्यासाठी बसले होते. दौंडज येथील दौंडज खिंड, तरसदरा, वाल्हे या परिसरातील शेतकरीवर्गाने यंदा झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली असली तरी पावसाच्या संततधारेमुळे त्यांचे नुकसान झाल्याने पुरवठ्यावर परिणाम होऊन झेंडूच्या फुलांचे भाव वधारण्याची शक्यता आहे.
करोनाच्या काळात मागील दोन वर्षे झेंडूच्या फुलांना फटका बसला होता. यंदा करोनाचे संकट टळले; परंतु अतिपावसाचा फटका झेंडू उत्पादकांना बसला. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात या फुलांना अतिपावसाचा फटका बसला. चांगला बाजारभाव देखील मिळाला नाही. शेतकऱ्यांना फुलांचे पैसे झाले नाहीत; मात्र झेंडू उत्पादकांना खंडेनवमी, दसरा या दिवशी चांगला बाजारभाव मिळेलच अशी आशा आहे.
जवळच जेजुरी औद्योगिक वसाहत असल्याने, औद्योगीकरण व परिसरातील विकासामुळे गोंड्याला दसऱ्याला तसेच खंडेनवमीला मोठी मागणी राहते. मंगळवारी खंडेनवमी असल्याने विविध कंपन्यात मशिनरींची पूजा केली जाते. कंपनीत तोरणे लावून आकर्षक फुलांची सजावट केली जाते. यासाठी गोंडा, झेंडू यांना विशेष मागणी राहते. त्यामुळे सोमवारी गोंडा, झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी कंपनीतील प्रतिनिधी, कामगार मोठ्या प्रमाणात येत होते.
ठोक बाजारात एक किलोचा भाव किमान 100 रुपयांच्या आसपास राहीले. झेंडूची फुले तसेच गोंड्याच्या पिवळ्या, केशरी फुलांना अधिक मागणी आहे. गोंड्याचे भाव सोमवारी (दि. 3) 70 ते 80 रुपये किलो आहेत. तर खंडेनवमीला तसेच दसऱ्याला ते 150 रुपयांच्या पुढेही जातील अशी अपेक्षा आहे.
-स्वप्निल शेंडकर, फूल उत्पादक