सलग पाचव्या वर्षी उत्कृष्ट मानांकन प्राप्त करत झोनमध्ये 9वा क्रमांक
इंदापूर – इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, इंडियन स्वच्छता लीग ही भारतातील पहिली आंतर-शहर स्पर्धेत विशेष कामगिरी पुरस्कार इंदापूर नगरपरिषदेला मिळाला आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवसाय मंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते नगरपरिषदेचा गौरव करण्यात आला.
देशातील लेह ते कन्याकुमारीपर्यंत 1,800 हून अधिक शहरांसाठी एक टीम तयार करून सहभागी झालेली होती. इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिक यांनी नगराध्यक्ष यांच्या सूचनेनुसार काम केल्याने देशपातळीवर अनोखा गौरव मिळवण्याची संधी प्राप्त झालेली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2022 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात शालेय विद्यार्थी तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा हिरीरीने सहभाग लाभला. याच जोरावर नगरपरिषदेने (25 ते 50 हजार) लोकसंख्येच्या गटात सलग पाचव्या वर्षी उत्कृष्ट मानांकन प्राप्त करत झोनमध्ये 9 वा क्रमांक पटकावला. तसेच सलग चार वेळेस थ्री स्टार हा बहुमान देखील मिळवला आहे.
बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, यांनी इंदापूर नगरपरिषदेचे अभिनंदन
केले आहे.