ग्रामीण साहित्य संमेलनांमुळे लिहिणाऱ्यांना अवकाश मिळतो :नीलम माणगावे

मायणी येथे बाराव्या युवा ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन
मायणी(प्रतिनिधी) – ग्रामीण जीवनात अनेक चढउतारांनी भरलेले समृद्ध अनुभवविश्‍व असते. त्यामुळे लिहिणाऱ्यांना मोठा अवकाश मिळतो. युवकांनी आपले जगणे, अनुभव कथा, कवितांच्या माध्यमातून व्यक्त करावेत. त्यामुळे युवा पिढीच्या समस्यांना वाचा फुटेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे यांनी केले.

अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत मायणी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने आयोजित बाराव्या युवा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सुरेंद्र गुदगे स्वागताध्यक्षपदी होते. संमेलनाचे उद्‌घाटक सुधाकर कुबेर, संचालक दिगंबर पिटके, कवयित्री अस्मिता इनामदार, डॉ. विजया पवार, भाऊसाहेब लादे व मान्यवर उपस्थित होते.

नीलम माणगावे म्हणाल्या, स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, बाई म्हणजे फक्त शरीर नव्हे. तिचे व्यक्‍तिमत्व, विचार, तिने घरासाठी खाल्लेल्या खस्ता, मातृत्व, मुलांचे संगोपन, वडिलधाऱ्यांचा सांभाळ, या सगळ्या गोष्टी म्हणजे बाई आहे. बाईवर प्रेम करणे म्हणजे फक्त तिच्या लैंगिक अवयवांवर प्रेम करणे किंवा मालकी हक्क सांगणे नव्हे तर तिच्या संपूर्ण व्यक्‍तिमत्वाला अवकाश मिळवून देणे, तिचे विचार व भावना समजून घेणे, म्हणजे तिच्यावर प्रेम करणे आहे. स्त्रीच्या प्रगतीआड पुरुषप्रधान संस्कृती नेहमीच येते. अनेक वेळा धार्मिक परंपरा पुढे करून तिच्या प्रगतीच्या वाटा रोखल्या जातात. म्हणूनच मी एका कवितेत लिहिले आहे की,
प्रकाशाच्या वाटेवर
नको राहू देवा
हो जरा बाजूला
मला उजेड हवा
हा उजेड शिक्षणाच्या, ज्ञानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतो; परंतु आज उच्चशिक्षण घेऊनही अनेकांची मती मातिमोल झाली आहे. वित्ताची तहान वाढली आहे. माणुसकी हरवत आहे. आज बहुजन समाज व स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. त्याच्या मुळाशी फुले-शाहू-आंबेडकर-कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेले कार्य आहे. विभागीय पातळीवर होणारी संमेलने म्हणजे ग्रामीण लेखक, कवींना मिळणारे मुक्त विचारपीठ आहे.

सुरेंद्र गुदगे म्हणाले, गेली 12 वर्षे हे संमेलन सातत्याने आयोजित केले जात आहे. या संमेलनांमुळे अनेक विद्यार्थ्यांमधून लेखक, कवी घडल्याचा आम्हाला अभिमान आहे. लेखक, कवींच्या विचारस्वातंत्र्याचे आम्ही स्वागत करतो. ते परखड सत्य मांडतात. सुधाकर कुबेर, संमेलनाचे समन्वयक डॉ. श्‍यामसुंदर मिरजकर यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजया कदम व प्रा. शिवशंकर माळी यांनी सूत्रसंचालन केले. वाङमय मंडळाचे प्रमुख डॉ. शौकतअली सय्यद यांनी आभार मानले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.