पंजाबचा गायक मुसेवाला यांच्या हत्येने भारतीय संगीतविश्व हादरलेले असतानाच हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा गायक केके यांच्या अकाली मृत्यूची खबर येऊन धडकली.
कोलकाता येथे कॉन्सर्टदरम्यान केकेंना प्रचंड घाम आला आणि दवाखान्यात नेईपर्यंत त्यांनी चाहत्यांचा कायमचा निरोप घेतला. अलीकडच्या काळात “कॉपी सिंगर’चे प्रस्थ वाढलेले असताना केकेंचा जादूई आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. जुन्या काळातील गायक चंचल यांच्यासारखा पहाडी तर कधी मृदू भासणारा केकेंचा आवाज सदैव स्मरणात राहणारा आहे.
हम रहे या ना रहे कल…
याद आएंगे ये पल…
दोन अडीच दशकांपूर्वीपर्यंत शाळा, महाविद्यालयापासून कार्यालयातील सेंड ऑफ (निरोप समारंभात) लोकप्रिय गायक किशोरकुमार यांचे प्रसिद्ध गाणे वाजविले जायचे. “चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना’. पण नव्या पिढीने केकेंच्या गीताला प्राधान्य दिले. “हम रहे या ना रहे कल… याद आएंगे ये पल…’ हे गीत आले आणि युवकांच्या मैफलीत वाजवले जाऊ लागले. दुर्दैवाने हेच गीत त्यांना अखेरचा निरोप देणारे ठरले.
मनोरंजनाच्या चॅनेलवर गीत आणि संगीत स्पर्धेत आजकाल गायक आणि गायिका परीक्षक म्हणून येतात. त्यांचे वलय, रुबाब, थाटबाट हा एखाद्या नायकांपेक्षा कमी नसतो. केके मात्र विरळ स्वभावाचे गायक होते. स्टेज शोच्या दरम्यान चाहते केकेंना भेटायचे आणि विचारायचे की, तुम्हीच का केके, ज्यांनी “तडप… तडप के इस दिलसे आह निकलती रही…’ हे गीत म्हटले आहे. याचे कारण केकेंनी कधीही प्रसिद्धीचा अट्टहास धरला नाही. आजच्या काळात प्रसिद्धी मिळविण्यासाठी हजारो लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले व्हिडिओ अपलोड करत राहतात आणि व्हायरल करत राहतात. अशा काळातही जादुई आवाजाची देणगी लाभूनही अलिप्त राहणारा केकेंसारखा गायक दुर्मीळच. लाखो चाहते असतानाही ते जमिनीवरच होते. प्रसिद्धीपासून नेहमीच दूर असणारे, आपल्या गाण्यावर लक्ष केंद्रित करणारे केके हे खूपच संयमी होते. त्यांच्या अकाली मृत्यूने जगभरात उमटलेल्या प्रतिक्रियांवरून केकेंच्या व्यक्तिमत्त्वाचे आकलन होते.
केके यांनी केवळ हिंदीच नाही तर तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराथी चित्रपटांसाठीही गाणी गायली.
चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी सुमारे 3500 जिंगल्स गायल्या. त्यांचा अवीट आवाज आणि गाण्याची लय ही त्यांच्या आवाजातील प्रतिभेचे दर्शन घडवतात. केकेंचा आवाज आरस्पानी असल्याने त्यांची गाणी ऐकताना श्रोते देहभान विसरून मंत्रमुग्ध होऊन जात असत. संथ गीताची लय पकडताना त्यांचा आवाज हृदयाला भिडायचा. त्यांच्या गळ्यातून जेव्हा वरचा स्वर निघायचा तेव्हा कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेले लोक अक्षरशः वेडे व्हायचे. उंच स्वरात सूर सरळ ठेवण्यात माहीर असणाऱ्या केकेंनी कोणत्याही बनवेगिरीशिवाय आणि कॉपीशिवाय आवाजात गोडवा कायम ठेवण्यात कौशल्य प्राप्त केले. या बळावरच त्यांनी भारतीय संगीत क्षेत्रात विशेषत: गायनात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले.
केकेंना चित्रपटात गाणे म्हणण्याची संधी मिळाली तेव्हा उदित नारायण, सोनू निगम, कुमार शानू यांचे वर्चस्व होते. या प्रस्थापितांच्या गर्दीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान मिळवणे वाटते तेवढे सोपे नव्हते. परंतु केकेंनी चमत्कार घडवला. चित्रपट होता “हम दिल दे चुके सनम’ आणि गीत होते “तडप-तडप के इस दिल से आह निकलती रही…’ पडद्यावर सलमान खान आणि ऐश्वर्या यांच्यातील विरहाच्या वेदना केकेंनी आपल्या आवाजातून इतक्या उत्कटपणे आणि आर्तभावाने गायल्या की, या गाण्यामुळे केके स्टार झाले.
मल्याळम आई-वडिलांचे पुत्र असलेले केके यांचे पूर्ण नाव कृष्णकुमार कुन्नत. दिल्लीत वाढलेले केके हे किरोडीमल कॉलेजमध्ये शिकले. गाणे म्हणण्याची हौस लहानपणापासूनच होती. आई मल्याळम भाषेत काहीतरी गुणगुणायची आणि वडील त्याचे रेकॉर्डिंग करायचे. आईचे गाणे ऐकून त्यांनी गुणगुणण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर गाणे म्हणण्याचे वेड वाढतच गेले. रियाज, सरावातून आपला आवाज आणखी प्रगल्भ केला. बालपणी असलेल्या मैत्रिणीबरोबर प्रेम केले आणि तिच्याशी विवाह केला.
विशाल भारद्वाजने गीतकार गुलजार यांचा चित्रपट “माचीस’मधील “छोड आये हम वो गलिया…’ या गाण्यात केकेंचा आवाज वापरला. त्यानंतर इस्माईल दरबार यांच्या “हम दिल दे चुके सनम’मध्ये संधी मिळाली आणि त्याचे केकेंनी सोने केले. नैसर्गिकरित्या केकेंच्या आवाजात गांभीर्याचे भाव होते. त्यात मार्दव होते, उत्कटता होती. थेट काळजाला भिडणारा त्यांचा स्वर होता. साहजिकच कॉलेजवयीन पिढीच्या मैफिलींमध्ये त्यांचे गाणे आवडीने म्हटले जाऊ लागले. ऑकेस्ट्रा, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये या गाण्याला मागणी होऊ लागली. “यारो दोस्ती बडी ही हसीन है’ हे गाणे तर तरुणपिढीमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले. त्यांचा आवाज तरुण पिढीसाठी आयुष्याचा अर्थ सांगणारा होता, मित्राचा अर्थ सांगणारा, मार्गदर्शन करणारा होता. जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांचा “जिस्म’ चित्रपटातील एका विरहगीतात युवकांच्या मनातील अस्वस्थता, एकटेपणा, निरर्थक जीवन, भरकटलेपणा हा भाव दिसून आला.
आवारापन बंजारापन
एक खला है सीने मे
हरदम हर पल बेचैनी है
कौन बला है सीने मे
हे केकेंनी गायलेले गीत अनेकांचे डोळे पाणावून गेले. तरुणांच्या भाषेतच सांगायचे झाल्यास त्यांच्या गायनात एक ऱ्हिदम होती. ग्लॅमरच्या दुनियेत असूनही गैरव्यवहार, गटबाजी, प्रसिद्धी यापासून ते दूर राहिले. याचे त्यांना नुकसानही सहन करावे लागले. चित्रपट उद्योगातील त्यांची मागणी कमी झाली. त्याची तमा न बाळगता स्टेज शो, लाइव्ह कॉन्सर्टमधून ते रसिकश्रोत्यांच्या भेटीला येत राहिले. अशाच प्रकारचा आनंद मिळवताना कोलकाता येथील लाइव्ह शो मध्ये त्यांची एक्झिट झाली. आपल्या आवाजाने रसिकांना भारावून सोडतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
– सोनम परब