मुंबई – जागतिक पातळीवर शेअर बाजार, कमॉडिटी बाजार आणि वित्तीय क्षेत्रात उलथापालथ होत आहे. त्याचा परिणाम भारतीय रुपयाच्या मूल्यावर होऊन शुक्रवारी रुपयाचा दर तब्बल 104 पैशांनी कोसळून रुपयाचा भाव प्रति डॉलरला 73 रुपये 47 पैशांवर गेला. रुपया दर कमी होण्याच्या प्रमाणात महागाई वाढण्याचा धोका असतो.
परकीय चलन वापरणाऱ्यांनी भारतात डॉलरची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम झाला. जागतिक बाजारात शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत. तर डॉलरची मागणी वाढून डॉलरचा भाव वाढत आहे.
वेगाने विकसित होणाऱ्या देशांच्या चलनावरही परिणाम झाला असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. रिझर्व बॅंकांनी गरजेपेक्षा जास्त भांडवल सुलभता निर्माण केली आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्यामुळे विविध कमॉडिटीजी मागणी वाढून दरवाढ होत आहे.
अशा परिस्थितीत महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे इतर चलनांच्या तुलनेत डॉलरची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकी सरकारच्या रोख्यावरील परतावा या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वाढला.
भारताकडे मोठ्या प्रमाणात परकीय चलनाचा साठा असल्यामुळे रुपयाचा दर आणखी कमी होऊ लागल्यास रिझर्व बॅंक डॉलरची विक्री करून डॉलरचे मूल्य स्थिर ठेवू शकते. रुपया जास्त कोसळू नये याकरिता केंद्र सरकार क्रुडच्या दरवाढीच्या प्रमाणात भारतीय बाजारात पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर वाढवीत आहे.
दरम्यान या महिन्यात क्रुडचा दर 20 टक्क्यांनी वाढून 65 डॉलर प्रति पिंपापर्यंत गेला आहे. या सर्व घडामोडी पाहता आगामी काळात भारतातील शेअर बाजार निर्देशांक, सोने -चांदी दर आणि इतर कमॉडिटीजचे दर अस्थिर राहण्याची शक्यता आहे.