सातारा : अंधश्रद्धेमुळे 14 वर्षीय मुलीचा मृत्यू; जिल्ह्यात प्रचंड खळबळ

देवऋषांमुळे घटना घडल्याचा आरोप : अंधश्रद्धा निर्मूलन समिती

सातारा – शिंदी, ता. माण येथील चौदा वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिचा मृतदेह गुप्तपणे एका ओढ्याच्या जवळ पुरण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या संपूर्ण घटनेची माहिती जादूटोणा कायद्यांतर्गत संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी दक्षता अधिकारी या तरतुदीनुसार असलेल्या अधिकारातून त्यांनी कारवाई करावी. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोन्ही देवऋषींची तसेच मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार्‍याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

शिंदी, ता. माण येथील बायली सुभाष इंगवले, वय 14 हिचे सतत डोके दुखत असे. तिला तापही आला होता. स्थानिक डॉक्टरांनी तिच्यावर प्रथमोपचार करून तिला घरी पाठवले होते. मात्र, कुटुंबीय तिला 20 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी गोंदवले येथील एका देवऋषीकडे घेवून गेले. त्याने तुमच्या घराच्या आसपास बारव आहे. तेथील भूत मुलीला लागले आहे. अमावास्यापर्यंत ती ठीक होईल, असे सांगून मंत्र-तंत्र करून त्यांना परत पाठवले. त्या मुलीला संध्याकाळी जास्त त्रास झाल्याने मोही, ता. माण येथील दुसर्‍या देवऋषाकडे तिला नेण्यात आले. त्यानेही तसेच सांगत तुमची मुलगी ठीक होणे खूप कठीण आहे. आजच्या रात्री 12 वाजेपर्यंत तिला धोका आहे, असे सांगून अंगारे-धुपारे करून परत पाठवले.

त्या रात्री घरातील सर्वजण मुलीला गराडा घालून बसले. मात्र, मुलगी शांत बसली होती. नंंतर तिचे हात-पाय थरथर कापत होते. रात्री 11.45 च्या दरम्यान ती मुलगी निपचित पडून तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे तिच्या कुटुंबीयांनी अत्यंत गुप्तपणे तिचा मृतदेह एका ओढ्याजवळ पुरल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना देवऋषांमुळे घडल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला असून समितीचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार, अ‍ॅड. हौसेराव धुमाळ, सीताराम चाळके यांनी त्या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भेट नाकारण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.