कोची- मुक्या जीवांच्या प्रेमासाठी लोक काय करतील, याचा नेम नाही. आपल्या लाडक्या मनीमाऊसाठी केरळमधील एका बहाद्दराने करोनामुळे राज्य सरकारने लादलेल्या निर्बंधाविरोधात लढा दिला आणि जिंकलाही. त्यासाठी न्यायलयीन लढा उच्च न्यायलयापर्यंत लढणाऱ्या या अवलीयाचं नाव आहे, एन. प्रकाश.
त्याचं झालं असं, एन. प्रकाश यांच्याकडे मांजरे आहेत. त्यांना मांजरांसाठी बिस्कीट आणावी लागतात. त्यांनी त्यासाठी स्थानिक पोलिसांकडे वाहनाचा पास मागितला. मात्र पोलिसांनी त्यांना नकार दिला. त्यामुळे निराश न होता प्रकाश यांनी चक्क उच्च न्यायलयात याचिका दाखल केली.
टेलीकॉन्फरसिंगने या याचिकेची सुनावणी झाली. त्यात प्रकाश यांनी केरळ उच्च न्यायालयापुढे आपली भूमिका मांडली. त्यांचा युक्तीवाद न्या. नंबीयार यांनी आपल्या निकालपत्रात नमूद केला आहे. ते म्हणतात “”… मी पूर्णत: शाकाहारी असल्याने माझ्या घरात मी मांसाहार शिजवत नाही. त्याचबरोबर “म्याव पर्शियन बिस्किीटा’ंशिवाय या मुक्या जीवांचे पान हालत नाही. त्याचे सात किलोचे पाकिट लॉक डाऊनच्या उर्वरीत काळासाठी या मांजरांना पुरेल. मात्र ही बिस्किट कोची जनावरांच्या दवाखान्यात मिळतात. ते काहीसे दूरआहे. त्यामुळे त्यांना वाहनाचा पास हवा आहे. तो पोलिसांनी नाकारला आहे.
मांसाधारीत बिस्किट हे त्यांच्या मांजराचा आहार आहे. ते शाकाहारी असल्याने ही बिस्किट हाच त्यांचा आधार आहे, असे स्पष्ट करत जनावरांच्या हक्कांबाबत असणाऱ्या कायद्याची थोडक्यात माहिती देत न्या. नंबीयार यांनी या व्यक्तीला मांजरांची बिस्किट आणण्यासाठी वाहन पास देण्याचे आदेश दिले. आमच्या आदेशामुळे आम्ही याचिकाच्या कर्त्याच्या घरातील “CATastrophe’ (अचानक येणारे संकट) टाळू शकतो, असे न्यायाधिसांनी निकालपत्रात म्हटले आहे.