- लॉकडाऊन जूनपर्यंत वाढविल्याचे आयुक्तांचे आदेश
पिंपरी – राज्यातील वाढत्या करोनाबाधितांची संख्या पाहता 14 मार्चपासून राज्यासह पिंपरी चिंचवड शहरातही लॉकडाऊन करण्यात आला आहे. शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील बाधितांची संख्या 2 हजारपेक्षा कमी येत आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण अद्यापही जास्त आहे. त्यामुळे राज्य शासनाने केलेल्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड शहरातही 1 जूनपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. तसेच राज्याबाहेरील येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने 15 मे पर्यंत लावलेला लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधितांचा आलेख स्थिरावला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात बाधितांची संख्या दोन हजारपेक्षा कमी येत आहे. असे असले तरी मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शहरात अजूनही भीतीचे वातावरण आहे. तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्याही 20 हजारांच्या घरात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी काटेकोरपणे नियम पाळणे आवश्यक आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातीलही लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढविण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.
मालवाहू वाहनांमध्येही दोघांनाच परवानगी
आदेशानुसार, पिंपरी चिंचवड शहरात बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना व वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 48 तासांपूर्वी काढलेला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक असणार आहे. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्तींना परवानगी असणार आहे. त्यामध्ये चालक आणि मदतनीस यांनाचा फक्त परवानगी असणार आहे. त्यांनाही आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल बंधनकारक असणार आहे. हा चाचणी अहवाल सात दिवसांसाठी वैध असेल. किरकोळ विक्री व होम डिलव्हरीकरिता यापूर्वी लावलेले वेळेचे बंधन असले तरी दूध संकलन व त्याची वाहतूक करण्यासाठी बंधन नसेल. विमानतळ, कार्गो सर्व्हिस व औषधे, उपकरणे यांची वाहतूक करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा असेल असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.