लस बनवणाऱ्या भारत बायोटेक कंपनीतील 50 जणांना करोनाची लागण; नेटकरी म्हणाले…

हैदराबाद, दि.13 –कोव्हॅक्‍सिन या करोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीतील 50 कर्मचाऱ्यांना करोना संसर्ग झाल्याची माहिती पुढे आली. त्यावरून नेटिझन्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. कर्मचाऱ्यांचे लसीकरण का करण्यात आले नाही, असा सवाल काहींनी विचारला. तर, काहींनी कंपनीच्या कार्याची प्रशंसा करताना लस जीवरक्षक ठरत असल्याचा अभिप्राय नोंदवला.

हैदराबादस्थित भारत बायोटेककडून 18 राज्यांना कोव्हॅक्‍सिनचा पुरवठा केला जात आहे. मात्र, तो पुरवठा सुरळित नसल्याच्या तक्रारी काही राज्यांकडून केल्या जात आहेत. त्यावर कंपनीच्या व्यवस्थापकीय सहसंचालिका सुचित्रा एल्ला यांनी ट्विटरवरून भूमिका मांडली. कंपनीच्या हेतूंबद्दल उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका नाउमेद करणाऱ्या आहेत.

करोना संसर्ग झाल्याने कंपनीचे 50 कर्मचारी सध्या कार्यरत नाहीत. तसे असूनही लॉकडाऊनमध्ये आम्ही दिवसाचे 24 तास लस उत्पादन करत आहोत, असे त्यांनी म्हटले. त्या ट्विटवर नेटिझन्सच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोनाची लागण कशी काय झाली? त्यांचे लसीकरण झाले नव्हते का? तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी भरती का केली नाही, अशा प्रश्‍नांची सरबत्ती एका ट्विटर युजरने केली. काही नेटिझन्सनी कोव्हॅक्‍सिनच्या प्रभावीपणाबद्दल साशंकता व्यक्त केली. अर्थात, लसनिर्मिती आणि पुरवठ्याच्या कार्यावरून अनेकांनी कंपनीचे कौतुकही केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.