जिनिव्हा, दि. 13 – इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान सुरू असलेला संघर्ष जर वेळीच थाबवला गेला नाही. तर उघड युद्ध भडकण्याचा धोका असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. इस्रायलने बुधवारी हमासच्या सैन्यदलांच्या ठिकाणांवर केलेल्या रॉकेट हल्ल्यात वरिष्ठ सैन्य अधिकारी ठार झाले. आणि गाझा पट्टीवर हल्ला चढवल्यामुळे तीन लष्करी टॉवरही उद्ध्वस्त केले गेले.
त्यानंतर आता पॅलेस्टाईनच्या हमासने इस्रालयवर पुन्हा क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले130 क्षेपणास्त्रांद्वारे केलेल्या आक्रमणात इस्रायलमधील 28 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात केरळमधील एका भारतीय महिलेचाही समावेश आहे.
सर्व इस्लामी देश पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. इस्रायलच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत 57 सदस्य देश असलेल्या इस्लामिक देशांची संघटनेने एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानने आपल्या ठरावात इस्राएली कारवाईसंदर्भात संयुक्त निवेदनांची मागणी केली. पाकिस्तानच्या या प्रस्तावाला इस्लामी देशांच्या संघटनेमध्ये एकमताने पाठिंबा दर्शविला गेला आहे.
इस्लामिक सहयोग संघटनेच्या सदस्य देशांतील राजदूतांनी इस्रायलच्या आक्रमकतेबद्दल आक्रोश व्यक्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात ही तातडीची बैठक आयोजित केली आणि पूर्व जेरूसलेममधील पॅलेस्टाईनच्या विरोधात इस्त्रायली सैन्याने केलेल्या बळाच्या निर्घृण उपयोगाचा’ निषेध केला. या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात ओआयसी राजदूतांनी सांगितले की, रमजानमधील पूर्व जेरुसलेममधील शेख जराह आणि गाझामधील पॅलेस्टाईन समर्थकांवर इस्त्राईलने केलेले हल्ले हे सर्व मानवतावादी नियम आणि मानवी हक्क कायद्याच्या विरोधात आहेत. अनेक दशकांपासून तेथे वास्तव्यास असलेल्या शेख जराह येथील रहिवाशांना बेदखल करण्यासाठी इस्त्रायलचे प्रयत्न त्वरित थांबवावेत, अशी विनंती इस्लामिक देशांच्या राजदूतांनी जागतिक समुदायाला केली.
न्यूयॉर्कमध्ये या विषयावरील बैठकीत तुर्की आणि सौदी अरेबियाच्या राजदूतांच्या महासभेचे विशेष अधिवेशन बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळण्याच्या प्रस्तावाला मान्यताही देण्यात आली. इस्लामिक सहयोग संघटनेच्या राजदूतांनी संयुक्त राष्ट्र संघात हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी सदस्य देशांचा एक गट तयार केलाय. पाकिस्तानही या गटाचा महत्त्वाचा सदस्य आहे.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी मंगळवारी जारी केलेल्या स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे की, पॅलेस्टाईनच्या भूभागातील हिंसाचाराबद्दल त्यांना गंभीर चिंता आहे. इस्त्रायली सुरक्षा दल आणि पॅलेस्टाईन समर्थकांमध्ये शांतता पूर्ववत होण्याची मागणी संयुक्त राष्ट्र संघटनेने केली होती.