पिंपरी, दि. 20 – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सर्व डीलर, ड्रायव्हिंग स्कूल, चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत याचे आयोजन करण्यात आले. या वेळी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीचे संचलन पार पडले. ट्रॅफिक पार्क येथून रॅलीची सुरूवात झाली. पिंपरी चिंचवड शहराच्या मुख्य भागातून प्रबोधन करत आरटीओच्या पिंपरी चिंचवड कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप झाला.
मोटार वाहन निरीक्षक बालाजी धनवे यांनी रस्ता सुरक्षा आभियानात जे उपक्रम राबवले त्यांची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. उप प्रादेशिक अधिकारी अतुल आदे यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत नियम पाळण्याचे आवाहन केले. या वेळी ई प्रतिज्ञा सर्टिफिकेटचे अनावरण करण्यात आले.
सर्व उपस्थितांकडून सुरक्षित वाहतुकीचे नियम पाळण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या प्रत्येकाचा आरटीओ कार्यालयामार्फत सन्मान करण्यात आला. रस्ता सुरक्षा हीच जीवन सुरक्षा हे ध्येय सर्वांनी आत्मसात करून पुढे या कार्यात योगदान देण्याचे आवाहन आरटीओच्या वतीने करण्यात आले.