पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. पहिल्या दिवशी 84 परीक्षांना सरासरी 95 टक्के उपस्थिती होती, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली. गतवर्षी विद्यापीठाला ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घ्याव्या लागल्या होत्या.
मात्र, यंदा नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर महाविद्यालये सुरू झाल्याने प्रथम सत्राच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे विद्यापीठाचे नियोजन होते. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. त्यानुसार मंगळवारपासून परीक्षांना सुरुवात झाली.
मंगळवारी तीन सत्रांत 84 विषयांची परीक्षा झाली. या परीक्षांसाठी 14 हजार 599 विद्यार्थी अपेक्षित होते. त्यातील 13 हजार 832 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यामुळे 95 टक्के सरासरी उपस्थित होती, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.