अहमदाबाद – पश्चिम बंगालच्या बहुप्रतिक्षित निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे वैचारिक कुटूंबप्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची अहमदाबाद येथे पाच ते सात डिसेंबर दरम्यान बैठक होणार आहे.
या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहतील. दोन्ही संघटनांचे अन्य काही वरीष्ठ नेतेही यावेळी उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाच्या बैठकीला नड्डा उपस्थित राहतील आणि दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करतील. ते सातला सायंकाळी अहमदाबाद सोडण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या बैठकीला काही केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळी सरकारच्या कामगिरीचा आढावा मंत्री मांडतील. तसेच येत्या काही वर्षातील करावयाच्या कामांबाबत धोरणात्मक मंथन होईल. शेतकऱ्यांची निदर्शने, कृषी कायदे, पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडूत होणारी निवडणूक यांवरही चर्चा करण्यात येणार आहेत.
या बैठकीचे स्वरूप हे अनौपचारिक असेल आणि टप्प्या टप्प्यात चर्चा करण्यात येईल. त्याबरोबर भाजपाच्या विविध मुद्द्यावरही त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या खेपेस अशी बैठक झाली. त्याला भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते.