लखनौ – समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देशात लवकरच उपलब्ध होणाऱ्या करोनावरील लसींचा उल्लेख भाजपची लस म्हणून केला. ती लस मी घेणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले.
उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या अखिलेश यांनी येथे पत्रकारांशी बोलताना भाजपच्या लसीवर विश्वास नसल्याचे म्हटले. जेव्हा आमचे सरकार येईल; तेव्हा सर्वांनाच मोफत लस पुरवू, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
देशभरात लसीकरणाची रंगीत तालीम सुरू असल्याच्या दिवशीच अखिलेश यांनी संबंधित वक्तव्य केले. त्यावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली. अखिलेश यांचा लसींवर विश्वास नाही आणि उत्तरप्रदेशच्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही.
लसींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अखिलेश यांनी देशातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचा अपमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते केशवप्रसाद मौर्य यांनी केली.
करोनावरील लस मोफत पुरवण्यावरून आधीच राजकारण सुरू झालेले दिसते. आता अखिलेश यांनी बहुप्रतीक्षित लसींना वेगळा राजकीय रंग चढवण्याचा प्रयत्न केल्याचे सूचित होत आहे.