बारामती – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बारामतीत बुधवारी (दि.1) शहरातून फेरी काढण्यात आली. दरम्यान, प्रशासकीय भवनासमोर मराठा बांधवांचे उपोषण सुरू असून त्यातील काही कार्यकर्त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे.
बारामती वकिल संघटनेने आंदोलनस्थळी जात मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवला होता. बुधवारी शहरातून फेरी काढण्यात आली. महिला व पुरुष वकिलांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दरम्यान बारामती शहरातील प्रशासकीय भवनासमोर समाजाकडून आमरण उपोषण सुरुच आहे.
उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीवर येथील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातील पथक 24 तास लक्ष ठेवून आहे. उपोषणकर्त्यांपैकी काहींची प्रकृती अत्यवस्थ बनली आहे. मुंबईतील सर्वपक्षीय बैठकीतही आरक्षणासंबंधी ठाम निर्णय झाला नाही. त्यामुळे समाजाच्या संतापात अधिकच भर पडली आहे.
कायदेशीर मदत लागली…
मराठा आरक्षणप्रश्नी बारामती वकील संघटना मराठा क्रांती मोर्चाच्या सोबत आहे. आरक्षणाच्या विषयात काही कायदेशीर मदत लागली तर ती करण्यास वकील वर्ग केव्हाही तयार आहे. याशिवाय खटले लढवायचे झाले तरी विनामूल्य सेवा दिली जाणार असल्याचे वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. उमेश काळे यांनी सांगितले.