रूपगंध: चला वटाणामधी खेळ खेळू…

म्हातारबाबांच्या या खुर्चीला लागून एखादे जुने टेबल असे. बाहेर हवेवर बसणाऱ्या म्हाताऱ्यांना याच टेबलावर चहा, नाष्टा, जेवण सर्व्ह केले जात असे. खाण्यांच्या या वेळेव्यतिरिक्‍त या टेबलांची मालकी बच्चे कंपनीकडे जात असे. त्याचा अभ्यासाचे टेबल म्हणून उपयोग करून झाल्यानंतर तोच टेबल त्यांच्या खेळांसाठी वापरला जात असे. त्याला आडवा ठेवून सापशिडी, चोर-पोलीस, जोडपत्ते इत्यादी खेळ त्याच्यावर रंगत, हे कमी म्हणून की काय कधीकधी टेबल टेनिससारखा खेळही या टेबलांवरच खेळला जाई. या आडव्या टेबलाला उभा केला की त्या वऱ्हांड्याचे रूपांतर क्रिकेटच्या मैदानात होई आणि ते टेबल म्हणजे स्टंप होत असत.

आधीच वावभर असलेल्या जागेत क्रिकेटचे मैदान झाले की, खेळता-खेळता चेंडू उघड्या दरवाजातून घरात शिरून स्टोव्हवर ठेवलेल्या कालवणात फेरी मारून येत असे. उघड्या दरवाजातून चेंडू घरात गेला की बाहेर वऱ्हांड्यातून पोरे सुबाल्या करीत. ज्या घरात चेंडू गेला आहे त्या घरातले पोर मग गुपचूप घरात शिरून गनिमाच्या तावडीतला चेंडू मोठ्या हिकमतीने घेऊन येई. कधीकधी याच मैदानाचा कुस्तीचा आखाडा होई तर कधी कबड्डीचे मैदान.

छोट्यांसाठी मैदानी खेळ खेळायला तयार असणारा हा वऱ्हांडा, वयात आलेल्यांना प्रेमाचे खेळ खेळायला जागा देई. आपल्याला आवडलेल्या व्यक्‍तीचे घर नजरेत येईल असा अँगल साधून प्रेमिक आपल्या प्रेमाच्या माणसाच्या हालचाली टिपत असत.

बऱ्याचदा फुटक्‍या आरशांचा वापर करून उन्हाचे कवडसे प्रेमिकेच्या घरात मारून आपल्या घरातून प्रेमिकेशी वार्तालाप साधला जाई. मंडळी, तुम्हाला वाटत असेल या सगळ्या भानगडी मजनूच करत असणार. हा तुमचा भ्रम आहे, मजनूच्या खांद्याला खांदा लावून चाळीतल्या लैलाही हिरिरीने भाग घेत. अनेकदा या लैलेच्या जवळच्या मैत्रिणीला बहीण आणि मजनूच्या जवळच्या मित्राला भाऊ मानून यांचे दळणवळण चालू असे.

प्रत्येक चाळीत या प्रेमिकांनी शोधलेली एक ना एक खुफिया जागा असे. घरातली मंडळी दुपारी वामकुक्षीत शिरली की ही मंडळी या खुफिया जागेत शिरत आणि तिथे प्रीतीचे झुळझुळ पाणी वाहू लागे. लपून छपून चाललेली ही गोष्ट जास्त दिवस टिकत नसे. कधीतरी कोणीतरी ही चोरी उघडकीस आणत असे. मग काही दिवस या वासू-सपनाला विरह सहन करावा लागे. चाळीत कोणाचाही विरहकाळ जास्त दिवस चालूच शकत नसे. मग पुन्हा एकदा नवी विटी नवे राज्य चालू होई. चाळीतल्या या वटणाने अनेक संसार उभे केले आहेत.

घरी आलेल्या पाहुण्यांची सोय बऱ्याचदा या वटणातच होत असे. उधार उसनवार करू आणलेल्या खुर्च्या पाहुण्यांना बसण्यासाठी देऊन त्यांचे आदरातिथ्य इथेच केले जाई. आल्या गेल्या पाहुण्यांना घरात नेले तर त्यांना चुकल्यासारखे वाटेल अशी परिस्थिती तेव्हा होती. त्यामुळे लग्नाची बोलणी, साखरपुडा, बारशी या सगळ्या कार्यक्रमाला आलेले कित्येक पाहुणे या वटणाच्या साह्याने जेवले आहेत.

प्रत्येक सुवासिनी हवे असलेले ऐसपैस तुळशी वृंदावन चाळीत तयार करणे ब्रह्मदेवालाही अशक्‍य होते. पण ब्रह्मदेवालाही आश्‍चर्यचकित करतील अशा रीतीने या वटणातच चाळीतल्या सुवासिनींनी तुळशी वृंदावने थाटली होती. इथे पुन्हा त्यांच्या मदतीला संपलेला डालड्याचा डबाच कामाला येत असे. दोनचार घरातल्या सुवासिनी मिळून अशा एखाद्या डालड्याच्या डब्यात तुळशीचे रोप लावून वटणाच्या भिंतीला बाहेरच्या बाजूला खिळ्याने लटकावून ठेवत. काही हौशी सुवासिनी पद्धतशीरपणे त्याला लोखंडाची जाळी बनवून तुळसाबाईची स्थापना करीत.

तुळसाबाईच्या जोडीने या लोखंडाच्या जाळीत त्यांचा छोटेखानी बगीचाही फुलत असे. सकाळी आन्हीके आटोपल्यानंतर सकाळचे घरातल्यांचे डब्बे भरून दिले की तुळशीला पाणी द्यायची वेळ येत असे. मंडळी, हे पाणी जरी तुळशीला घातले जात असले तरी या पाण्याचा अभिषेक खालून जाणाऱ्या वाटसरूंना होत असे.

चाळीतल्या लोकांना या पाणी घालण्याच्या वेळांची माहिती असल्याने ते या अभिषेकापासून दूर राहात. पण एखादा नवखा माणूस एकदा का या अभिषेकाची शिकार झाला की तो आयुष्यभर कोणत्याही चाळीच्या खालून जाताना या अभिषेकाला कसे टाळायचे ते आपोआप शिकत असे. पाण्याच्या या अभिषेकाबरोबर वटणातून खाली येणाऱ्या इतरही अनेक गोष्टींचे अभिषेक होत असत. मशेरी आणि तंबाखू हे चाळीचे ट्रेडमार्क अभिषेक. मशेरी लावणारे आणि तंबाखू खाणारे तोंडात भरलेल्या तोबऱ्याचा अभिषेक खाली जाणाऱ्यांवर वटणातूनच करत.

रात्रीच्या वेळेस या वऱ्हांड्यात अनेक जणांचे बिछाने पसरत असत. बैठकीच्या गाळ्यात राहणारे, घरात जास्त माणसे असणाऱ्या अनेक जणांचा बिस्तरा या वऱ्हांड्यातच पसरत असे. अनेकदा नव-विवाहित नवरोबालाही जागेअभावी आपली पथारी वटणातच टाकावी लागे. मिलनाच्या गोड रात्री “मधु इथे आणि चंद्र तिथे’ अशा काटल्या जात. पण घरातल्या लोकांच्या दृष्टीने असलेला हा विरह, मित्रांच्या साह्याने घरातल्यांच्या लक्षातही येऊ न देता मिलनात रूपांतरित केला जात असे.

आपल्या ज्वानीत या विरहाची आधीच झळ लागली असल्याने घरातले लग्न झाल्यावर किंबहुना लग्न ठरल्यापासूनच घरातल्या थोरांची नजर आजूबाजूला भिरभिरत असायची. आजूबाजूचे कोणी बाहेरगावी जाणार असल्यास त्यांना विनंती करून त्यांची खोली या नवविवाहितांच्या सुपूर्त केली जात असे. इथे मागणाऱ्याला आणि देणाऱ्यालाही खोलीच्या देवाण-घेवाणीचा अजिबात संकोच वाटत नसे. चाळीच्या कुटुंबातला हा एकोपा जगाच्या पाठीवर कुठेही अनुभवायला मिळणार नाही हे मुंबईच्या चाळींचे वैशिष्ट्य आहे.

बदलत्या काळानुरूप चाळीतल्या चाळकऱ्याची बढती फ्लॅटमध्ये झाली आहे. एकमेकांच्या प्रत्येक सुख-दु:खात सतत साथीला असणारी ही मंडळी आज फ्लॅटमध्ये राहताना, त्यांना सतत राहूनराहून छळतात त्या चाळीतल्या गोड आठवणी. तो मायेचा, प्रेमाचा ओलावा बंद दारांच्या फ्लॅटमध्ये एकदम “फ्लॅट’ होऊन गेलाय. फ्लॅटच्या बंद दाराआड हे प्रेम विस्मृतीत गेले आहे याची जाणीव चाळीत गेल्यानंतर हटकून होते.

ठेचकाळणाऱ्या वऱ्हांड्यात मिळणारा मायेचा ओलावा या ठेचांवर मायेची फुंकर घालतो. चाळीत कोणालाही आलेल्या अडी-अडचणीच्या वेळी ठेचकळला तरी चाळकरी धावत होता. दुसऱ्याचे दु:ख आपले मानून त्याला मायेचा हात देत होता. डोळ्यात आलेले पाणी आपल्या हाताने पुसत होता. शेजाऱ्यांचे सुख-दु:ख हे आपले सुख-दु:ख मानून राहत होता.

आज फ्लॅटमध्ये सगळे काही आहे. घरात मुबलक जागा असल्याने नवपरिणीतांच्या मिलनासाठी दुसऱ्याकडे जागेची उसनवारी करायची गरज नाही. बंद दारामागे सगळा कारभार फक्‍त एकाच कुटुंबांचा. फ्लॅटमध्ये सगळे काही असताना, नाही आहे ते प्रेम, मायेचा ओलावा. कालवणात पडलेला चेंडू कालवणातून काढून आपल्या मुलाला दिसेल असा ठेवणारा, चार महिने गॅलरीत कंदील लटकावत ठेवणारा, रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही रांगोळी काढून आनंद कमावणारा, मिळेल का हो, हा प्रेमाचा ओलावा फ्लॅट संस्कृतीत?

– डॉ. नरेंद्र कदम

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.